वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दुर्गम भागातील नागरिक अनेकदा जखमी किंवा मृत्युमुखी पडतात. त्यासोबतच अनेकदा नागरिकांच्या पाळीव प्राण्यांवर वन्यजीव हल्ला करतात. या हल्ल्यात जखमी झालेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारी मदत देण्यात येते.
वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे (ढोल) यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास 28 नोव्हेंबरच्या 2018 च्या शासन निर्णयामधील तरतुदींनुसार अर्थसाहाय्याची रक्कम संबंधितांना देण्यात येते तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे गाय, बैल, म्हैस, मेंढी, बकरी किंवा इतर पशुधनाचा मृत्यू, अपंग किंवा जखमी झाल्यास 11 नोव्हेंबर 2016 च्या शासन निर्णयामधील तरतुदींनुसार अर्थसाहाय्याची रक्कम संबंधितास देण्यात येत आहे. महसूल विभागाकडून या संदर्भातील अध्यादेश काढला आहे.
व्यक्ती मृत झाल्यास – 20 लाख रुपयांपैकी 10 लाख त्याच्या वारसदारांना तत्काळ धनादेशाद्वारे देणे व उर्वरित रक्कम दहा लाख रुपये त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणा- या संयुक्त खात्यामध्ये ठेव रक्कम (फिक्स डिपॉझिट) जमा करण्यात यावी.
व्यक्ती कायम अपंग झाल्यास – 5 लाख रुपये, तर व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास 1 लाख 25 हजार रुपये, तसेच व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास द्यावे औषधोपचारासाठी येणारा खर्च दिला जातो. मात्र, खासगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा 20 हजार रुपये प्रतिव्यक्ती राहील.
गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यू झाल्यास – बाजारभाव किंमतीच्या 75% किंवा सत्तर हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम मिळणार
मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास – बाजारभाव किंमतीच्या 75% किंवा 15 हजार रुपये- वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 मधील कलम (18-अ) प्रमाणे. गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास – बाजारभाव किंमतीच्या 50% किंवा पंधरा हजार रुपये. गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येतो.
(फक्त औषधोपचार शासकीय जिल्हा परिषद पशुचिकित्सालयात करण्यात यावा.)