आर्थिक मंदीचे सावट! फूड डिलिव्हरी नंतर आता Amazon चा आणखी एक निर्णय, भारतातील ‘ही’ सेवा बंद | पुढारी

आर्थिक मंदीचे सावट! फूड डिलिव्हरी नंतर आता Amazon चा आणखी एक निर्णय, भारतातील 'ही' सेवा बंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : टेक आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲमेझॉनने (Amazon) फूड डिलिव्हरी आणि एडटेक सेवा बंद केल्यानंतर आता भारतातील वितरण सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे. ॲमेझॉनने त्यांच्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. एका सूत्राने म्हटले आहे, “आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. कंपनी आता मुख्य व्यवसायांवर अधिक लक्ष केंद्रित करेल.”

Amazon चे वितरण मुख्यतः बंगळूर, हुबळी आणि म्हैसूर येथून होते आणि यात सुमारे ५० लोक कार्यरत आहेत. वितरण युनिट कंपन्या आणि वितरकांकडील ग्राहकोपयोगी वस्तू किरकोळ विक्रेत्यांपर्यंत वेगाने पोहोचवते. ॲमेझॉन इंडियाने यापूर्वी शुक्रवारी त्यांची फूड डिलिव्हरी सेवा (Amazon Food) बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज ॲमेझॉन इंडियाने पुढील वर्षी त्यांची एडटेक शाखा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी त्यांचा फूड डिलिव्हरी व्यवसायही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ॲमेझॉनने त्यांच्या रेस्टॉरंट पार्टनर्संना सांगितले आहे की त्यांनी मे २०२० मध्ये सुरू केलेली फूड डिलिव्हरी सेवा २९ डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे वृत्त मनीकंट्रोलने दिले होते.

ॲमेझॉनने मे २०२० मध्ये Amazon Food सेवा लाँच केली होती. आता ही सेवा बंद केली जाणार आहे. त्याआधी कंपनीने भारतात लाँच केलेले एडटेक यूनिट बंद करण्याची घोषणा केली होती. ॲमेझॉनने जगभरात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरु केली आहे. आता त्यांनी त्यांचे काही व्यवसायही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Amazon ने त्यांची सेवा बंद केली जात असल्याबद्दल म्हटले आहे की आम्ही वार्षिक ऑपरेटिंग रिव्ह्यू प्रोसेसनंतर Amazon Food सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. जी बंगळूरमध्ये आम्ही प्रायोगिक तत्त्वावर सुरु केली होती. इतर सेवांबाबत कंपनीने सांगितले की, “आम्ही भारतीय बाजारपेठेसाठी वचनबद्ध आहोत आणि किराणा, स्मार्टफोन आणि कंन्झूमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि सौंदर्य, तसेच Amazon व्यवसायासारख्या B2B ऑफरिंग्जमध्ये गुंतवणूक करणे कायम ठेवू.”

ॲमेझॉनने कर्मचारी कपातही मोठ्या प्रमाणात सुरु केली आहे. ॲमेझॉन त्यांच्या १० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. याआधी ट्विटर, फेसबुकची मूळ कंपनी मेटाने नोकर कपात केली आहे.

हे ही वाचा :

Back to top button