लंडन; पुढारी ऑनलाईन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी चीन सोबतच्या परराष्ट्र संबंधाबाबत भूमिका स्पष्ट केली. चीनसोबतच्या संबंधांचा तथाकथित सुवर्णकाळ आता संपला असल्याचे सांगत सुनक यांनी ब्रिटनला चीनसोबतचा दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. आपल्या पहिल्याच परराष्ट्र धोरणाच्या मुद्यावरील भाषणात पंतप्रधान सुनक म्हणाले की गेल्या दशकातील घनिष्ठ आर्थिक संबंध साधे सरळ होते. पण आता ब्रिटनला प्रतिस्पर्धी देशांच्या प्रति व्यावहारिकता जपण्याची गरज आहे. त्यांनी पुढे बोलताना चीनचे जागतिक महत्त्व दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही, असेही नमूद केले.
शी जिनपिंग यांच्या झीरो कोव्हिड धोरणाविरुद्ध चीनमध्ये (China Covid Protests) लोकांचे आंदोलन सुरु आहे. यानंतर लगेच सुनक यांनी चीन संदर्भात वक्तव्य केले आहे. चीनमध्ये पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. रविवारी शांघायमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान वृत्तांकन करणाऱ्या बीबीसीच्या पत्रकाराला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला पोलिसांनी मारहाण केली. या घटनेचा ब्रिटन सरकारने निषेध नोंदवला आहे.
सुनक यांनी उद्योजक आणि परराष्ट्र धोरण तज्ज्ञांना संबोधित करताना म्हटले की, चीनने आंदोलन मोडून काढण्याचा मार्ग अवलंबला आहे. हे योग्य नाही. आम्हाला माहित आहे की चीनची भूमिका ही आमची मूल्ये आणि हितसंबंधांसाठी एक आव्हान आहे. हे एक असे आव्हान आहे जे अधिक तीव्र होत जाते. कारण ते आणखी मोठ्या हुकूमशाहीकडे जाते.
'सुवर्णयूग' हा शब्दप्रयोग माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या अंतर्गत जवळच्या आर्थिक संबंधांशी संबंधित आहे. पण तेव्हापासून लंडन आणि बीजिंगमधील संबंध बिघडले आहेत, असेही ते म्हणाले. जागतिक घडामोडीत जागतिक आर्थिक स्थिरता अथवा हवामान बदल प्रश्नी चीनचे महत्त्व दुर्लक्ष करू शकत नाही, यावर सुनक यांनी जोर दिला.
ते पुढे म्हणाले की ब्रिटन आता अमेरिकेसह कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जपान या सहयोगी देशांसोबत मुत्सद्दीपणा आणि प्रतिबद्धता यासह तीव्र स्पर्धा करेल. याचा अर्थ असा आहे की आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात मोठी भाषणबाजी करुन नव्हे तर मजबूत व्यावहारिकतेने उभे रहायला हवे.
ऋषी सुनक आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या महिन्याच्या सुरुवातीला इंडोनेशियातील G20 शिखर परिषदेदरम्यान भेटणार होते. पण पोलंडमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ही भेट रद्द झाली होती. आता त्यांनी चीनसोबतच्या संबंधाबाबत ठोस भूमिका जाहीर केली आहे.
दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी-२० शिखर परिषदेदरम्यान भेट झाली होती. यानंतर तीन हजार भारतीयांना दरवर्षी व्हिसा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. आधीपासून भारत आणि ब्रिटनचे द्विपक्षीय संबंध चांगले राहिले आहेत. आता ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान मुक्त व्यापार करारावर भर दिला जात आहे.
हे ही वाचा :