Pm Modi-Rishi Sunak : पंतप्रधान मोदींबरोबरील भेट फलद्रूप; ब्रिटनच्‍या पंतप्रधानांनी केली भारताबाबत मोठी घोषणा | पुढारी

Pm Modi-Rishi Sunak : पंतप्रधान मोदींबरोबरील भेट फलद्रूप; ब्रिटनच्‍या पंतप्रधानांनी केली भारताबाबत मोठी घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बाली येथे सुरु असलेल्‍या जी-२० शिखर परिषदेत आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट झाली. या भेटीनंतर भारतीय नागरिकांसाठी खुषखबर आली आहे. ऋषि सुनक यांनी भारतातील तीन हजार तरुणांना ब्रिटनचा व्हिजा देण्‍याची घोषणा केली आहे. अशा प्रकारे व्‍हिजा योजनेचा लाभ होणारा भारत हा पहिला देश ठरणार असल्‍याचे ब्रिटनच्‍या सरकारने म्‍हटलं आहे. तसेच यामुळे भारत आणि ब्रिटनमधील व्‍यापार संबंध अधिक दृढ होण्‍यास मदत होणार आहे.

ब्रिटन पंतप्रधान कार्यालयाने केले ट्वीट

या निर्णयासंदर्भात ब्रिटनच्‍या पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे. यामध्‍ये म्‍हटलं आहे की, भारतातील १८ ते ३० वयोगटातील पदवीधर शिक्षित भारतीयांना ब्रिटनमध्‍ये दोन वर्षांपर्यंत राहण्‍यासाठी आणि काम करण्‍यासाठी दरवर्षी तीन हजार जागा उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल.

भारत-ब्रिटनमधील व्‍यापार संबंध होणार अधिक दृढ

मागील महिन्‍यात सुनक यांनी ब्रिटनच्‍या पंतप्रधानपदाची सूत्रे स्‍वीकारली. यानंतर प्रथम जी -20 परिषदेनिमित्त दोन्‍ही नेत्‍यांची प्रथमच भेट झाली. या भेटीसंदर्भात ब्रिटनच्‍या पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी सांगितले की, ब्रिटन भारतासोबत व्‍यापार वृद्‍धीगंत करण्‍यासाठी करार करणार आहे. सर्व प्रक्रिया योग्‍यरित्‍या पार पाडली आणि या करारास मान्‍यता मिळाली तर भारताचा हा युरोपियन देशासोबतचा अशा प्रकारचा करार करणार पहिला देश ठरणार आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button