Rishi Sunak : ऋषी सुनक यांच्याकडून युक्रेनला ५० दशलक्ष पौंड मदतीची घोषणा | पुढारी

Rishi Sunak : ऋषी सुनक यांच्याकडून युक्रेनला ५० दशलक्ष पौंड मदतीची घोषणा

पुढारी ऑनलाईन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे त्यांच्या कणखर निर्णयामुळे केवळ देशातच नाही तर परदेशातही ओळखले जातात.  ऋषी सुनक हे यूक्रेनमध्ये पोहोचले. त्‍यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली.  तसेच रशियाविरोधी सुरू असलेल्या युद्धात ब्रिटन युक्रेनला मदत करतच राहणार असल्याची घोषणाही त्‍यांनी या वेळी केली. एवढेच नाही तर युक्रेनचे नागरिक आणि येथील पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी सुनक यांनी हवाई संरक्षण पॅकेजही जाहीर केले आहे.

ब्रिटन युक्रेनला ड्रोनविरोधी तंत्रज्ञान पुरवणार: ऋषी सुनक

ब्रिटन युक्रेनला ५० दशलक्ष पौंड संरक्षण पॅकेज देणार असल्याची घोषणा या वेळी ऋषी सुनक यांनी केली.  यामध्ये ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाचाही समावेश आहे. शिवाय दर्जेदार रडार आणि ड्रोनचा समाना करणारे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान आणि युद्धासाठी लागणारी सामग्री युक्रेनला पुरवली जाणार असल्याचेही सुनक यांनी सांगितले.

युद्ध संपेपर्यंत मी युक्रेनच्या पाठीशी

युक्रेनमधील कीव्‍ह शहरात ऋषी सुनक यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली. भेटीदरम्यान ऋषी सुनक म्हणाले की, “ब्रिटन सुरुवातीपासूनच युक्रेनच्या पाठीशी उभा आहे. याचा मला अभिमान आहे. ब्रिटन आणि आमचे मित्रराष्ट्र युक्रेनसोबतच्या युद्धाच्या शेवटपर्यंत उभे राहतील हे सांगण्यासाठी मी आज येथे आलो आहे. रशियन सैन्याला मागे टाकण्यात आमच्या युक्रेनियन सैन्याला मोठ्या प्रमाणात यश आल्याचे सुनक यांनी सांगितले.  ब्रिटनला माहित आहे की, हा एका देशाचा स्वातंत्र्याचा लढा आहे. म्हणूनच आम्ही सर्वपातळीवर युक्रेनसोबत  आहोत.”  लवकरच युक्रेनला 50 दशलक्ष पौंड लष्करी मदत देणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मानले आभार

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सुनक यांच्यासोबतच्या भेटीचा व्हिडीओ ट्विट करत ब्रिटनच्या सतत मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. तुमच्यासारख्या मित्रांच्या मदतीनेच युक्रेनला युद्धात विजयाची खात्री आहे. आम्ही आमचे स्वातंत्र्य टिकवून ठेवू, असा विश्वास देखील झेलेन्स्की यांनी या भेटीदरम्यान व्यक्त केला आहे.

हेही वाचा:

Back to top button