Jeff Bezos | टीव्ही, कार, फ्रीज खरेदी करु नका, आर्थिक मंदी येतेय, अब्जाधीश जेफ बेझोस यांचा सल्ला | पुढारी

Jeff Bezos | टीव्ही, कार, फ्रीज खरेदी करु नका, आर्थिक मंदी येतेय, अब्जाधीश जेफ बेझोस यांचा सल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगात सध्या वाढती महागाई आणि मंदीचे वातावरण आहे. यामुळे अनेक दिग्गज कंपन्यांनी नोकरकपात करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Amazon founder Jeff Bezos) यांनी नुकतीच सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत ग्राहक आणि छोट्या उद्योगांना एक इशारा दिला आहे. लोकांनी येत्या काही महिन्यांत मोठ्या खरेदीचा निर्णय पुढे ढकलण्याचा विचार करावा. कारण जगभरात आर्थिक मंदीची शक्यता असल्याचे बेझोस यांनी म्हटले आहे.

अब्जाधीश असलेले बेझोस यांनी अमेरिकन नागरिकांना नवीन कार आणि टीव्ही खरेदी करू नका असे सांगितले आहे. कारण अमेरिका मंदीच्या दिशेने झुकत आहे, घरगुती कर्ज १६.५ ट्रिलियनपर्यंत वाढले आहे आणि अमेरिकन लोक कर्जावर अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

“लोकांना माझा सल्ला आहे की, तुम्ही काही खरेदी करणार असाल, तर ती थोडी कमी करा. पैसे बचत करा,” असे बेझोस यांनी सल्ला दिला आहे. तुम्ही एक मोठ्या स्क्रीनचा टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही थोडे थांबा, तुमच्याकडे असलेले पैसे राखून ठेवा आणि काय घडते ते पहावे लागेल. ऑटोमोबाईल, रेफ्रिजरेटर किंवा इतर कोणत्याही वस्तू खरेदी करताना हाच विचार करा. पैसे खर्च करण्याबाबत कोणतीही जोखीम घेऊ नका,” असे त्यांनी मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

“सध्याच्या अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नाही. आर्थिक मंदीचे सावट आहे. अनेक कंपन्यांमध्ये सध्या नोकरकपात सुरु आहे.” असेही त्यांनी नमूद केले आहे. छोट्या व्यवसायिकांनी त्यांची आर्थिक तरतूद वाढवावी. नवीन उपकरणे खरेदी करणे थांबवावे असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Amazon founder Jeff Bezos) त्यांची बहुतांश संपत्ती चॅरिटीला दान करणार आहेत. CNN ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत त्यांनी खुलासा केला आहे. त्यांच्या १२४ अब्ज डॉलर संपत्तीपैकी मोठा हिस्सा ते हवामान बदल, सामाजिक आणि राजकीय असमानता या क्षेत्रात काम करणाऱ्या चॅरिटींना मदत म्हणून देणार आहेत.

हे ही वाचा :

Back to top button