Elon Musk | ट्विटरने ५० टक्के कर्मचाऱ्यांना का काढून टाकले?, एलन मस्क यांचा ट्विट करत खुलासा | पुढारी

Elon Musk | ट्विटरने ५० टक्के कर्मचाऱ्यांना का काढून टाकले?, एलन मस्क यांचा ट्विट करत खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटरमधून (Twitter) मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात सुरुच असून यावर ट्विटरचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी खुलासा केला आहे. मस्क यांनी ट्विट करत म्हटले आहे की ट्विटरला मोठा तोटा सहन करावा लागत असून यामुळे ५० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. “कंपनीला रोज ४० लाख डॉलर ($4M) पेक्षा जास्त तोटा होत असून कर्मचाऱ्यांच्या कपातीशिवाय दुसरा पर्याय नाही,” असे मस्क (Elon Musk) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

”प्रत्येक ट्विटर कर्मचार्‍याला तीन महिन्यांचा मोबदला देण्याची ऑफर देण्यात आली होती, जी कायदेशीररित्या दिल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.” असेही मस्क यांनी नमूद केले आहे. एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर जगभरातील कर्मचाऱ्यांची कपात सुरु केली आहे. ट्विटरने सुमारे ७,५०० पैकी निम्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. भारतात ट्विटरचे २०० हून अधिक कर्मचारी आहेत. यातील बहुतांश जणांना काढून टाकण्यात आले आहे. काहीजणांना कामावरून काढून टाकल्याचे ईमेल पाठवण्यात आले आहेत.

ट्विटरमधून इंजिनिअरिंग, सेल्स, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन टीममधील अनेकजणांना काढून टाकण्यात आले आहे. भारतातील मार्केटिंग आणि कम्युनिकेशन विभागातील संपूर्ण टीमला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ट्विटर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले आहे की त्याच्या सहकाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकल्याचे अथवा कायम ठेवले असल्याचे ईमेल आले आहेत. याआधी गुरुवारी पाठवलेल्या ईमेलमधून कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास मनाई केली होती. जर तुम्ही ऑफिसला येत आहात तर मागे फिरा, असे कर्मचाऱ्यांना कळवण्यात आले होते.

भारतातील ट्विटरच्या कम्युनिकेशन टीमची लीडर पल्लवी वालिया हिने ट्विटरमधून काढून टाकल्याची माहिती दिली होती. २५ वर्षीय असलेला भारतीय यश अग्रवाल यालादेखील ट्विटरमधून काढून टाकण्यात आले आहे. त्याने ट्विटरवर आपल्या आनंदी फोटोसोबत पोस्ट अपलोड केली होती. त्याने पोस्टखाली “#lovetwitter” आणि “#lovewhereyouworked” असे हॅशटॅग दिले आहेत. ”मला काढून टाकण्यात आले आहे. ट्विटरसोबत काम करणे हा एक सन्मान होता.” असे त्याने ट्विटमध्ये म्हटले होते.

हे ही वाचा :

Back to top button