Shashi Tharoor : गुजरात निवडणुकीसाठी प्रचार करण्यास शशी थरूर यांचा नकार | पुढारी

Shashi Tharoor : गुजरात निवडणुकीसाठी प्रचार करण्यास शशी थरूर यांचा नकार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पुढील महिन्यात गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नुकतीच स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर  (Shashi Tharoor) यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. दरम्यान, शशी थरूर यांना काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने गुजरातमध्ये प्रचारासाठी आमंत्रित केले होते; परंतु त्यांनी प्रचारासाठी येण्यास नकार दिला आहे.

प्रचार यादीतून काँग्रेसने शशी थरूर (Shashi Tharoor) यांना डावलल्याचा इन्कार केला असला तरी, काँग्रेसने प्रचाराच्या पहिल्या टप्प्यासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये थरूर यांचे नाव नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी वढेरा, अशोक गेहलोत, भूपेश बघेल, भूपेंद्र सिंह हुडा, दिग्विजय सिंह, कमलनाथ, सचिन पायलट, तारिक अन्वर, बी. के. हरिप्रसाद, अशोक चव्हाण, शक्तीसिंह गोहिल, रघु शर्मा, मोहन प्रकाश यांचा या यादीत समावेश आहे.

गुजरातमध्ये 27 वर्षांहून अधिक काळ भाजपची सत्ता आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (आप) राज्यातील विरोधकांना पर्याय म्हणून स्वत:ला सादर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. अशा स्थितीत गुजरात निवडणुकीबाबत काँग्रेस आता सक्रिय होताना दिसत आहे. गुजरात निवडणुकीची जबाबदारी पक्षाने अनेक बड्या नेत्यांवर सोपवली आहे. मात्र, शशी थरूर यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे शशी थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. थरूर यांनी निवडणुकीत हेराफेरीचे आरोपही केले होते. गांधी कुटुंब हे खर्गे यांचे समर्थक मानले जात होते. अशा परिस्थितीत स्टार प्रचारकांच्या यादीतून शशी थरूर यांचे नाव गायब होण्यावरून अनेक तर्कवितर्क केले जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button