
Rise in Indian deposits in Switzerland Swiss bank ₹ 37,600 crore in Swiss banks data black money 2024 financial exchange
बर्न (स्वित्झर्लंड) : स्विस नॅशनल बँकेने (SNB) दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, स्विस बँकांमध्ये भारतीय व्यक्ती आणि संस्थांनी ठेवलेल्या पैशांमध्ये सन 2024 मध्ये तिप्पट वाढ झाली आहे. सुमारे 3.54 अब्ज स्विस फ्रँक्स (अंदाजे 37,600 कोटी रूपये) इतक्या उच्च पातळीवर ही रक्कम पोहोचली आहे. स्विस बँकेतील भारतीयांची ही रक्कम सन 2021 नंतरची सर्वाधिक आहे.
या वाढीमधील बहुतांश हिस्सा बँकिंग माध्यमांतून व इतर वित्तीय संस्थांच्या खात्यांद्वारे जमा झालेला आहे. थेट भारतीय ग्राहकांच्या वैयक्तिक खात्यांमधील ठेवांमध्ये फक्त 11 टक्के वाढ झाली असून ती 346 दशलक्ष फ्रँक्स (सुमारे 3675 कोटी रुपये) इतकी आहे. ही रक्कम एकूण भारतीय-संबंधित निधीच्या केवळ एक दशांश इतकीच आहे.
स्विस नॅशनल बँकेच्या माहितीनुसार, 3.54 अब्ज स्विस फ्रँक इतका एकूण निधी वेगवेगळ्या स्वरूपात आहे
3.02 अब्ज स्विस फ्रँक (CHF) : इतर बँकांद्वारे
346 दशलक्ष स्विस फ्रँक: वैयक्तिक ग्राहक खाती
41 दशलक्ष स्विस फ्रँक: ट्रस्ट्स व फिड्युशरी संस्थांमार्फत
135 दशलक्ष स्विस फ्रँक: बाँड्स व इतर आर्थिक साधनांद्वारे
2023 मध्ये ही रक्कम 70 टक्क्यांनी घटून फक्त 1.04 अब्ज स्विस फ्रँक इतकी झाली होती, जी मागील चार वर्षांतील सर्वात कमी होती. त्यामुळे 2024 मधील ही वाढ ही लक्षणीय पुनरुज्जीवन मानले जात आहे. मात्र, 2006 मध्ये झालेल्या सर्वकालीन उच्चांक 6.5 अब्ज स्विस फ्रँकच्या तुलनेत अजूनही ही रक्कम खालच्या स्तरावर आहे.
स्विस बँकांमधील हे पैसे म्हणजे 'ब्लॅक मनी' आहे, असे थेट म्हणता येणार नाही, असे स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांनी सांगितले की, "भारतीय रहिवाशांकडून स्वित्झर्लंडमध्ये ठेवलेली संपत्ती ही थेट काळा पैसा आहे, असे समजणे चुकीचे आहे. स्वित्झर्लंड भारताच्या करचोरीविरोधातील लढ्यात पूर्ण सहकार्य करत आहे."
2018 पासून भारत व स्वित्झर्लंड यांच्यात स्वयंचलित माहिती विनिमय करार (AEOI) अंतर्गत दरवर्षी माहिती सामायिक केली जाते. पहिली माहिती सप्टेंबर 2019 मध्ये भारताला देण्यात आली होती आणि त्यानंतर नियमितपणे शंभरांहून अधिक प्रकरणांमध्ये माहिती देवाणघेवाण झाली आहे.
2024 मध्ये स्विस बँकांमध्ये असलेल्या एकूण परकीय निधीत (977 अब्ज स्विस फ्रँक) थोडी घट झाली असून, त्यात भारतीयांचा हिस्सा वाढून 1.59 अब्ज स्विस फ्रँक झाला आहे. त्यामुळे भारताची जागतिक क्रमवारीत 48 वी रँक झाली आहे (2023 मध्ये ती 67 वी होती). मात्र, 2022 च्या तुलनेत (46 वी रँक) ती थोडी खाली आहे.
यूके: 222 अब्ज स्विस फ्रँक
अमेरिका: 89 अब्ज स्विस फ्रँक
वेस्ट इंडीज: 68 अब्ज स्विस फ्रँक
इतर प्रमुख देश: जर्मनी, फ्रान्स, हाँगकाँग, लक्झेंबर्ग, सिंगापूर, ग्वेर्नसे, यूएई
पाकिस्तान: 272 दशलक्ष स्विस फ्रँक (घट)
बांगलादेश: 589 दशलक्ष स्विस फ्रँक (लक्षणीय वाढ)
बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स (BIS) च्या आकडेवारीनुसार, स्विस बँकांमध्ये असलेल्या भारतीय बिगर-बँक ग्राहकांच्या ठेव व कर्जामध्येही 6 टक्के वाढ झाली आहे. 2024 मध्ये ही रक्कम USD 74.8 दशलक्ष (सुमारे ₹650 कोटी) इतकी झाली.
गेल्या तीन वर्षांत सतत घसरणीनंतरची ही पहिली वाढ आहे. 2007 मध्ये ही रक्कम USD 2.3 अब्ज इतकी उच्चांकी होती.