धान्य महागणार ? : युक्रेनसोबतच्या धान्य निर्यात कराराला रशियाचा मोडता | पुढारी

धान्य महागणार ? : युक्रेनसोबतच्या धान्य निर्यात कराराला रशियाचा मोडता

युक्रेन सोबतच्या धान्य निर्यात कराराला रशियाचा मोडता

पुढारी ऑनलाईन – काळ्या समुद्रातून युक्रेनच्या धान्य निर्यातीला परवानगी देणाऱ्या करारातून रशिया बाहेर पडला आहे. त्यामुळे जगभरात अन्नधान्याच्या किंमती पुन्हा वाढण्‍याशी शक्‍यता  निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्र आणि तुर्की यांच्या पुढाकाराने जुलै महिन्यात हा करार झाला होता. यामुळे युद्धाच्या स्थितीतही युक्रेन  हा काळ्या समुद्रामार्गे अन्नधान्याची निर्यात करू शकत होता. (Russia suspends grain export deal with Ukraine)या करारातून बाहेर पडत असल्याची घोषणा रशियाने शनिवारी केली आहे.

युक्रेनने सेवस्तापूल या परिसरात हल्ले केल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे रशियाने म्‍हटलं आहे. युक्रेनने ब्रिटनच्या मदतीने नागरी जहाजांवर दहशतवादी हल्ले केल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे, असेही रशियाने स्‍पष्‍ट केले आहे. युक्रेनने  सर्व आरोप नाकारले असून रशिया ब्लॅकमेल करत असल्याची टीका केली आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगभरातील गव्हाच्या किंमती वाढल्या होत्या. याची झळ जगातील बहुतांश देशांना बसली विशेष करून गरीब राष्ट्रांना हा फार मोठा फटका होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी पुढाकार घेऊन रशिया आणि युक्रेन यांच्यात समेट घडवला, त्यामुळे युक्रेनला काळ्या समुद्रातून धान्याची निर्यात करणे शक्य झाले.

गहू, बार्ली, सूर्यफूल, मका यासाठी जग मोठ्या प्रमाणावर काळ्या समुद्राच्या परिसरात येणाऱ्या देशांवर अवलंबून आहे, असे Economic Times च्या वृत्तात म्हटलं आहे. याशिवाय खतांच्‍या किमतीही वाढणार असल्याचेही या वृत्तात नमूद करण्‍यात आले आहे. रशिया या करारातून बाहेर पडल्याचा फटका युक्रेनमधील शेतकऱ्यांनाही बसेल,युक्रेनचे शेतकरी धान्य लागवड करण्याचे टाळेल. यामुळे महागाईत अधिकच भर पडेल, असे या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button