मॉस्को ः वृत्तसंस्थारशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे राईट हँड मानले जाणारे सहकारी अॅलेक्झांडर दुगीन यांची मुलगी दारिया हिचा कार बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. युक्रेनमधील रशियन समर्थक डोनेस्क प्रांतातील कमांडर डेनिस पुशलिन यांनी हा हल्ला युक्रेनने केल्याचा दावा केला आहे. 20 वर्षीय दारिया ही पत्रकार होती. तिने रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचे समर्थन केले होते.
दारिया मॉस्कोतील एका सांगितिक कार्यक्रमातून घरी परतत असताना ही घटना घडली. रशियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दारियाचे वडीलच या हल्ल्याचे लक्ष्य होते. त्यांच्याच हत्येचा कट रचला गेला होता. कारण या कारमध्ये तेही बसणार होते. पण त्यांचा निर्णय बदलला होता. ते दुसर्या गाडीत बसले होते. त्यांची गाडी दारिया हिच्या गाडीच्या मागेच होती.
दुगीन यांना पुतीन यांचा 'ब्रेन' म्हणूनही ओळखले जाते. पुतीन जो विचार करतात, त्या मागे दुगीनच असतात. युक्रेनवरील हल्ल्यामागेही दुगीन यांचाच हात असल्याचे सांगितले जात आहे. रशियाने 2014 मध्ये क्रिमियावर कब्जा केला होता. त्यानंतर 2015 पासून अमेरिकेने दुगीन यांच्यावर निर्बंध लावले होते.