पुढारी ऑनलाईन डेस्क : उझबेकिस्तानमधील समरकंद येथे सुरू असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेदरम्यान शुक्रवारी (दि. १६) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान युक्रेन युद्धाबाबतही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना म्हणाले, मला माहिती आहे की, युक्रेनचे युद्ध सुरु होऊन सहा महिने लोटले आहेत. पण, आजचे युग हे युद्धाचे युग नाही. तसेच मोदी यावेळी म्हणाले की, युक्रेन संघर्षावर तुमची स्थिती आणि तुमच्या चिंतेची माहिती मला आहे. यावेळी पुतीन यांनी आम्ही या स्थितीवर लवकरात लवकर मार्ग काढू असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. (SCO Summit 2022)
पंतप्रधान मोदी यांनी युद्धादरम्यान विद्यार्थांना भारतात परतण्यासाठी केलेल्या मदतीसाठी रशिया आणि युक्रेनचे आभार मानले आहेत. तसेच भारत आणि रशिया द्विपक्षीय संबंधांवर व विविध मुद्यांवर फोनवरून देखिल बातचीत झाल्याची माहिती यावेळी नरेंद्र मोदी यांनी दिली. (SCO Summit 2022)