पृथ्वी किती लोकसंख्या सामावून घेऊ शकते? | पुढारी

पृथ्वी किती लोकसंख्या सामावून घेऊ शकते?

न्यूयॉर्क : सध्या जगाची लोकसंख्या सुमारे 8 अब्ज इतकी आहे. अर्थातच आपली पृथ्वी नेहमीच इतकी गजबजलेली होती असे नाही. भूतकाळात लोकसंख्या कमी होती; पण विशिष्ट टप्प्यांनंतर ती वाढत गेली. अशावेळी पृथ्वी किती लोकसंख्या सामावून घेऊ शकते किंवा किती लोकसंख्येचा भार सहन करू शकते, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. एका संशोधकाने याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

सुमारे 3 लाख वर्षांपूर्वी ज्यावेळी आधुनिक मानवाचे पूर्वज असलेले ‘होमो सेपियन्स’ अस्तित्वात आले त्यावेळी त्यांची लोकसंख्या शंभर ते दहा हजारांपर्यंत मर्यादित होती. ही संख्या दुप्पट होण्यासाठी 35 हजार वर्षांचा काळ जावा लागला. अमेरिकेतील रॉकफेलर युनिव्हर्सिटीतील लॅबोरेटरी ऑफ पॉप्युलेशन्सचे प्रमुख जोएल ई. कोहेन यांनी ही माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितले की 15 हजार ते 10 हजार वर्षांदरम्यान ज्यावेळी शेतीचा शोध लागला त्यावेळी पृथ्वीवर दहा लाख ते 1,00,00,000 माणसं होती. ही लोकसंख्या दुप्पट होण्यास 1500 वर्षांचा काळ लागला. सोळावे शतक येईपर्यंत लोकसंख्या दुप्पट होण्याचा काळ 300 वर्षांपर्यंत खालावला. 19 व्या शतकापर्यंत तो 130 वर्षांपर्यंत पोहोचला. 1930 ते 1974 पर्यंत पृथ्वीची लोकसंख्या केवळ 44 वर्षांमध्ये दुप्पट झाली.

आता प्रश्न असा आहे की पृथ्वी किती लोकसंख्येला सामावून घेऊ शकते? सन 1679 मध्ये अँटोनी व्हॅन लिऊवेनहोक या सूक्ष्मदर्शकाचा शोध लावणार्‍या संशोधकाने या प्रश्नाचे उत्तर ‘13.4 अब्ज’ असे दिलेले होते. मात्र, पृथ्वी सामावून घेणार्‍या लोकसंख्येचा असा निश्चित आकडा सांगता येत नाही. माणूस नैसर्गिक साधनसंपत्तीचे किती संवर्धन करतो व ती किती प्रमाणात खर्च करतो यावर आपले पर्यावरण किती लोकसंख्येला सामावून घेईल हे ठरू शकते.

Back to top button