जागतिक ओझोन दिन विशेष… : ‘ओझोन मित्र’ उत्पादनांचा वापर महत्त्वाचा! | पुढारी

जागतिक ओझोन दिन विशेष... : ‘ओझोन मित्र’ उत्पादनांचा वापर महत्त्वाचा!

कोल्हापूर ; प्रवीण मस्के : कोरोना काळात प्रदूषणात घट झाली. परिणामी, ओझोनच्या र्‍हासाला काहीअंशी आळा बसला होता. मात्र, कोरोनानंतर दिवसेंदिवस सर्वच प्रकारचे प्रदूषण वाढत चालल्याने वातावरणातील ओझोनचे प्रमाण कमी होत आहे. ओझोन थराचे रक्षण सर्वांचीच जबाबदारी असून ‘ओझोन मित्र’ उत्पादनांचा वापर केल्यास ओझोन र्‍हासाला आळा बसणार आहे.

विरळ होत चाललेल्या ओझोन थराविषयी जागरुकता निर्माण करणे व ओझोन थराचे जतन करण्यासाठी दरवर्षी 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीची ओझोन दिनाची संकल्पना ‘मॉट्रियल प्रोटोकॉल 35 : ग्लोबल कोऑपरेशन प्रोटेक्टिंग लाईफ ऑन अर्थ’ आहे. ओझोनच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘व्हिएन्ना करार’ 22 मार्च 1985 रोजी झाला. ओझोन थराचा क्षय करणार्‍या पदार्थांवरील नियमावलींच्या संदर्भात 16 सप्टेंबर 1987 रोजी ‘मॉट्रियल करार’ करण्यात आला.

ओझोनचा थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 40-50 कि.मी.वर आढळत असून यास ‘जीव रक्षक’ म्हणून ओळखले जाते. ओझोनचा थर सूर्याकडून येणार्‍या अतिनील किरणांपासून रक्षण करतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम ओझोन वायूच्या थरावर झाला आहे. क्लोरोफ्ल्युरोकार्बन्स, हॅलोन्स आणि मिथिल ब—ोमाईड ही ओझोनच्या र्‍हासास कारणीभूत मुख्य प्रदूषके आहेत.

ही रासायनिक संयुगे एअर कंडिशनर व रेफ्रिजेरेटर्स तयार करण्याच्या कारखान्यातून व कीटकनाशकांच्या फवारणीतून वातावरणात मिसळली जातात, जी पुढे घातक ठरतात. निवार्‍याच्या नावाखाली वनसंपदेवर कुर्‍हाड चालवली जात आहे. परिणामी, निसर्ग चक्रात बदल झाला आहे. मानवामध्ये त्वचेचा कर्करोग, मोतिबिंदू, गुणसूत्रांमधील बदल यासारखे तर पिकांवरदेखील याचा विपरीत परिणाम होत आहे. यासाठी ओझोनचा थर महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

वाहने, कारखाने व इतर कारणांनी उत्सर्जित हानिकारक रासायनिक वायूंमुळे ओझोनवर विपरीत परिणाम होत आहे. सद्यस्थितीत औद्योगिकीकरणामुळे ओझोनला मोठे छिद्र पडले असून या वायूचा थर विरळ होत चालला आहे. याचे विपरीत परिणाम पृथ्वीवर दिसून येत असून जागतिक तापमान वाढ, ऋतुचक्रामध्ये बदल दिसून येत आहेत. सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी सूर्यापासून येणार्‍या अतिनील किरणांना रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे ओझोनच्या आवरणास संरक्षण देणे ही काळाची गरज आहे, असे पर्यावरण तज्ज्ञांना वाटते.

जागतिक तापमानवाढ ही मोठी समस्या बनली असून ओझोनचा र्‍हास ही जगासाठी चिंताजनक बाब आहे. माँट्रियल करार ओझोन थर वाचविण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. वेगवेगळ्या पर्यावरणीय कराराची सध्या काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. सामान्य नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखणे त्याचबरोबर नवीन संशोधन, तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज आहे.
– डॉ. आसावरी जाधव, प्रभारी विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ

Back to top button