Pakistan Politics : इम्रान खान यांच्‍यावर अटकेची टांगती तलवार ; जाणून घ्‍या काय आहे प्रकरण … | पुढारी

Pakistan Politics : इम्रान खान यांच्‍यावर अटकेची टांगती तलवार ; जाणून घ्‍या काय आहे प्रकरण ...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्‍या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सरकारने त्‍यांच्‍यावर दहशतवादाला खतपाणी घालत असल्‍याचा आरोप केला आहे. पाकिस्‍तान दहशतवाद प्रतिबंधक कायदान्‍वये पोलिसांनी त्‍यांच्‍यावर गुन्‍हाही दाखल केला आहे. याप्रकरणी त्‍यांना अटक होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

Pakistan Politics : काय आहे प्रकरण?

इम्रान खान यांनी नुकतीच इस्‍लामाबाद येथील एफ-९ पार्कमध्‍ये एक जाहीर सभा घेतली. यावेळी त्‍यांनी भाषणात पाकिस्‍तान सुप्रीम कोर्टचे न्‍यायाधीश, प्रशासनातील वरिष्‍ठ अधिकारी आणि पाकिस्‍तान सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. हे भाषण प्रक्षोभक असल्‍याचा दावा सरकारने केला आहे. इम्रान खान हे देशातील जनतेला सरकार, न्‍यायालय आणि
लष्‍कराविरोधात भडकवत असून, त्‍यांना देशात यादवी माजवायची आहे, असा आरोप त्‍यांच्‍यावर ठेवण्‍यात आला आहे. यामुळेच आता इलेक्‍ट्रॉनिक मीडिया नियामक मंडळाने इम्रान खान यांच्‍या भाषणाच्‍या थेट प्रसारणावर बंदी आणली आहे. तसेच यापुढही यांच्‍या भाषणाचे थेट प्रसारण करु नये, असा आदेश दिला आहे.

प्रक्षोभक भाषण प्रकरणी इम्रान खान यांच्‍याविरोधात दहशतवाद विरोधी प्रतिबंधक कायदान्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. त्‍यांना अटक करण्‍यासाठी पोलीस त्‍याच्‍या बनीगाला येथील निवासस्‍थानी गेली होती. मात्र येथे त्‍यांच्‍या समर्थकांची प्रचंड गर्दी होती. त्‍यामुळे पोलिसांनी कारवाई केली नाही. इम्रान खान यांना अटक केल्‍यास देशात दंगली उसळतील, असा इशारा त्‍यांच्‍या समर्थकांनी दिला असल्‍याचे पाकिस्‍तानमधील माध्‍यमांनी म्‍हटले आहे.

अटक टाळण्‍यासाठी इम्रान खान यांचे पलायन

पाकिस्‍तानमधील मीडिया रिपोर्टसने दिलेल्‍या माहितीनुसार, इम्रान खान यांनी सध्‍या पंजाब प्रांतात आश्रय घेतला आहे. अटक टाळण्‍यासाठी त्‍यांनी पलायन केले असून ते आपल्‍या समर्थकांचा वापर ढाली सारखा करत आहे. इम्रान खान यांचा पाकिस्‍तान तहरीक-ए-इन्‍साफ (पीटीआय ) पक्षाच्‍या नेत्‍यांनी आता धमकी देणे सुरु केले आहे. दरम्‍यान, अटक
टाळण्‍यासाठी इम्रान खान यांनी आज इस्‍लामाबाद उच्‍च न्‍यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला आहे. इम्रान खान यांचे वकील बाबर अवान आणि फैसल चौधरी यांनी ही याचिका दाखल केली आहे. इम्रान खान हे सत्ताधारी पाकिस्‍तान डेमोक्रेटिक मूव्‍हमेंट या पक्षाला निशाणा साधत आहेत. भ्रष्‍टाचार आणि भ्रष्‍ट नेत्‍यांविरोधात बोलल्‍यामुळे त्‍यांना टार्गेट केले जात असल्‍याचा दावा पाकिस्‍तानमधील दैनिक ‘डॉन’ने केला आहे.

Pakistan Politics : इम्रान खान समर्थक नेत्‍यांनी दिली धमकी

पाकिस्‍तान सरकारने इम्रान खान यांना अटक केली तर पीटीआय कार्यकर्ते हे इस्‍लामाबाद ताब्‍यात घेतील, अशी धमकी
इम्रान खान यांचे निकटवर्ती आणि माजी मंत्री अली अमीन खान यांनी दिली आहे. तर पीटीआयचे नेते हसन नियाजी यांनी देशभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. खासदार अली अमीन गंडापूर यांनी पोलिसांनी राजकारणात हस्‍तक्षेप करु नये, असे आवाहन केले आहे.

आरोप सिद्‍ध झाल्‍यास काय होईल शिक्षा ?

इम्रान खान यांच्‍याविरोधात दहशतवाद प्रतिबंधक कायदा १९९७ मधील सातव्‍या कलमानुसार गुन्‍हा दाखल झाला आहे. या आरोपावर फास्‍ट ट्रॅक न्‍यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी इम्रान खान दोषी आढळल्‍यास त्‍यांना आजीवन कारावास ते फाशीपर्यंत शिक्षा होण्‍याची शक्‍यता आहे. पाकिस्‍तानमधील राजकीय विश्‍लेषकांच्‍या मते, “पाकिस्‍तानमधील सरकार हे इम्रान खान यांचा आवाज दडपण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. इम्रान खान हे सर्वसामान्‍य जनतेसमोर सरकारवर हल्‍लाबोल करत आहेत. त्‍यांनी सरकारविरोधातील आंदोलन तीव्र केले आहे. त्‍यांना जनतेचे समर्थनही मोठ्या प्रमाणावर मिळत असल्‍याचे चित्र आहे.”

हेही वाचा : 

 

Back to top button