FTX Crypto Cup | १७ वर्षीय प्रज्ञानंदनं वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला तिसऱ्यांदा हरवलं | पुढारी

FTX Crypto Cup | १७ वर्षीय प्रज्ञानंदनं वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला तिसऱ्यांदा हरवलं

पुढारी डेस्क : सतरा वर्षीय भारतीय ग्रँड मास्टर आर. प्रज्ञानंद (Indian Grandmaster Praggnanandhaa Rameshbabu) याने FTX क्रिप्टो कपच्या (FTX Crypto Cup) बुद्धिबळ स्पर्धेत ५ वेळा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन असलेल्या मॅग्नस कार्लसन (world champion Magnus Carlsen) याचा पराभव केला आहे. या आधीही आर. प्रज्ञानंदने कार्लसनला हरवले होते. अवघ्या सहा महिन्यांत तिसऱ्यांदा भारतीय ग्रँडमास्टर प्रग्नानंधाने विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला हरवले आहे. दोघांचा स्कोअर २-२ असा बरोबरीत सुटला होता. त्यानंतर प्रज्ञानंदने कार्लसनला ब्लिट्झ टायब्रेकमध्ये पराभूत केले. कार्लसन जिंकण्याच्या मार्गावर होता. पण त्याने प्रज्ञानंदच्या विरुद्ध चूक केली. पण मॅग्नसने अधिक गुणांच्या आधारे ही स्पर्धा जिंकली आणि प्रग्नानंधाला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.

जागतिक क्रमवारीत ६व्या क्रमांकावर असलेल्या लेव्हॉन अरोनियनविरुद्ध ३-१ अशा विजयासह सलग चार विजयांसह प्रज्ञानंदने स्पर्धेत चांगली सुरुवात केली होती. त्याने अलिरेझा फिरोज्जावर विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने अनिश गिरी आणि हंस निमन यांना पराभूत केले. पण पाचव्या फेरीत त्याची विजयी मालिका खंडित झाली. प्रग्नानंधा चीनच्या क्वांग लिम ले याच्या हातून पराभूत झाला. सहाव्या फेरीत टायब्रेकमध्ये पोलंडच्या जॅन-क्रिझिस्टॉफ डुडा याच्याकडून त्याला पराभव स्वीकारावा लागला. त्याचा हा दुसरा पराभव होता. (FTX Crypto Cup)

प्रज्ञानंद २०१६ मध्ये वयाच्या १० व्या वर्षी जगातील सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर बनला होता. त्याने एअरथिंग्स मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत (Airthings Masters rapid chess tournament) कार्लसनचा पराभव केला होता.

Back to top button