थायलंड : पबमध्ये भीषण आग लागून १३ जणांचा होरपळून मृत्यू, ४० जखमी | पुढारी

थायलंड : पबमध्ये भीषण आग लागून १३ जणांचा होरपळून मृत्यू, ४० जखमी

बँकाँक; पुढारी ऑनलाईन : थायलंडमध्ये एका नाईट पबमध्ये मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ४० जण जखमी झाले आहे. ही घटना बँकाँकच्या आग्नेयेकडील चोन बुरी प्रांतातील सट्टाहिप जिल्ह्यात घडली आहे. ज्या पबमध्ये आग लागली त्याचे नाव माउंटन बी पब (Mountain B pub) असे आहे. मृतांचा आकडा ४० वर जाण्याची भिती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सट्टाहिप जिल्ह्यातील माउंटन बी नाईट पबमध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व थाई नागरिक आहेत. या आगीत नऊ पुरुष आणि चार महिलांचा मृत्यू झाला आहे. एक मजली असलेल्या पब इमारतीसमोर चार मृतदेह होरपळलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. तर तीन पुरुषांचे मृतदेह स्वच्छतागृहात, एकाचा डीजे बूथवर आणि पाच जणांचा कॅशियर बूथवर आढळून आल्याचे वृत्त Bangkok Post ने दिले आहे.

फ्लू ता लुआंगचे पोलीस प्रमुख कर्नल वुटिपोंग सोमजाई यांनी सांगितले की, मृतांमधील सर्वजण थाई नागरिक आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की त्यांनी डीजेच्या बूथजवळ दोन स्फोटांचे आवाज ऐकले. त्यानंतर ठिणग्या पडून आग वेगाने पसरली.

चोन बुरीचे पोलिस कमांडर पोल मेजर जनरल अथासित कितजहान यांनी सांगितले की, आगीत सुमारे ४० लोक जखमी झाले आहेत. आगीत आठ जण गंभीररित्या होरपळले आहेत. हा पब एक महिन्यापूर्वीच सुरु करण्यात आला होता. येथे ग्राहक संगीताचा आनंद घेत असताना आगीचा भडका उडाला. त्यामुळे गोंधळ उडून पबमध्ये चेंगराचेंगरी झाली.

याआधी १ जानेवारी २००९ रोजी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बँकाँकमधील सांतिका पबला आग लागून ६६ जणांचा मृत्यू झाला होता आणि २०० हून अधिक लोक जखमी झाले होते. आता पुन्हा एका पबला आग लागून मोठी जीवितहानी झाली आहे.

Back to top button