

पिंपरी : सन 2017 च्या चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार महापालिका निवडणूक होणार असल्याने पुन्हा एसटी, एससी, ओबीसी व सर्वसाधारण गटासाठी आरक्षण सोडत काढावी लागणार आहे. मतदार याद्यामध्ये बदल करावा लागणार नाही. मात्र, पुन्हा नव्याने कामकाज करावे लागणार असल्याने महापालिका प्रशासनाची दमछाक होणार आहे. महापालिकेची मुदत 12 मार्च 2022 ला संपली. आगामी निवडणुकीचे वेध डिसेंबर 2021 पासून सुरू झाले होते. राज्यातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने चारऐवजी तीन सदस्यीय प्रभागरचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला.
तसेच, दहा वर्षांत वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात 11 नगरसेवक संख्या वाढविली. त्यामुळे एकूण 139 नगरसेवक संख्या झाली.
त्यानुसार नव्याने 46 प्रभागरचना करण्यात आल्या. ओबीसीसह आरक्षण सोडतही काढली गेली. तसेच, प्रभागनिहाय मतदार याद्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. आता, केवळ निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार, याची प्रतीक्षा केली जात होती. मात्र, नव्याने झालेल्या शिंदे व फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाने सन 2017 नुसार चार सदस्यीय प्रभागरचना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता नव्याने 128 जागांसाठी आरक्षण सोडत काढावी लागणार आहे. तर, सन 2017 च्या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार असून, पाच वर्षांतील नव्याने नोंद झालेल्या मतदारांची नावे प्रभागासह जोडावी लागणार आहेत. पुन्हा नव्याने काम करावे लागणार असल्याने महापालिका प्रशासनाची दमछाक होणार आहे.
आयोगाच्या निर्देशानुसार महापालिकेची कार्यवाही
त्रिसदस्यीय प्रभागरचनेनुसार आगामी निवडणुकीसाठी सर्व कामकाज पिंपरी-चिंचवड महापालिकेने पूर्ण केले आहे. राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेकडून कामकाज केले जाईल, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.