थंड फ्रेंच फ्राइज दिल्याबद्दल McDonald's च्या कर्मचाऱ्यावर गोळीबार | पुढारी

थंड फ्रेंच फ्राइज दिल्याबद्दल McDonald's च्या कर्मचाऱ्यावर गोळीबार

न्यूयॉर्क; पुढारी ऑनलाईन : अमेरिकेत गोळीबाराचे सत्र सुरुच आहे. नुकताच मॅकडोनाल्डच्या (McDonald’s) एका कर्मचाऱ्यावर थंड फ्रेंच फ्राइज दिल्याबद्दल गोळीबार करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यूयॉर्कमधील एका व्यक्तीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एका व्यक्तीला त्याच्या आईला थंड झालेले फ्रेंच फ्राइज (cold french fries) दिल्याबद्दल राग आला आणि त्याने रागाच्या भरात मॅकडोनाल्डच्या कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडल्या.

संशयित २० वर्षीय मायकेल मॉर्गन याने न्यूयॉर्क येथील ब्रुकलिनमध्ये २३ वर्षीय मॅकडोनाल्डच्या (McDonald’s) कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ४० वर्षीय महिला आणि मॅकडोनाल्डचा कर्मचारी यांच्यात फ्रेंच फाइजवरुन वाद झाला. त्यानंतर महिलेच्या मुलगा मॉर्गन याने कर्मचाऱ्यावर गोळीबार केला. संशयित हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याला याआधीही अनेकवेळा अटक करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.

न्यूयॉर्कमधील गोळीबाराच्या घटना गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ९ टक्क्यांनी कमी झाल्या आहे. न्यूयॉर्क शहर पोलीस विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी १,०५१ गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. यंदा ९८८ गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. स्मॉल आर्म्स सर्व्हे ग्रुपनुसार, अमेरिकेतील प्रत्येक १०० लोकांमागे जवळपास १२० बंदुका आहेत. Gun Violence Archive नुसार २०२० मध्ये ४५ हजारांहून अधिक लोक गोळीबारात मारले गेले. यातील निम्या लोकांचा मृत्यू आत्महत्या केल्याने झाला आहे.

Back to top button