पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनच्या दोन उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांच्या लिक झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे चीनचा तैवानवर (China Taiwan Conflict) लष्करी कारवाई करण्याचा इरादा उघडकीस आला आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीन धोक्याशी खेळत आहे, गरज पडली, तर आम्ही तैवानच्या मदतीसाठी लष्करी कारवाई करू, असे म्हटले आहे. "आम्ही वन चायना हे धोरण मान्य केले आहे. पण लष्करी कारवाईने जर तैवानवर ताबा मिळवला जाणार असेल, तर ते आम्हाला मान्य नाही," असेही जो बायडेन यांनी म्हटले आहे.
(China Taiwan Conflict) चीनमध्ये जन्मलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी ही क्लिप ट्विट केली आहे. तसेच ही क्लीप ल्युड या युट्यूब चॅनलवरही अपलोड करण्यात आली आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या काही वरिष्ठांनीच ही क्लीप लीक केल्याचे सांगितले जात आहे. तैवानचे लष्करी सामर्थ्य नष्ट करणे, आणि चीनचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी तैवानशी युद्ध करण्यासाठी मागेपुढे न पाहाणे, असे या ऑडिओ क्लीपमध्ये म्हटले आहे. या कारवाईसाठी किती सैनिकी बळ लागेल, कोणकोणती शस्त्रास्त्र वापरली जातील, याची सविस्तर चर्चा या व्हिडिओत होताना दिसते.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सध्या क्वॉड बैठकीसाठी जपानमध्ये आहेत, त्यांनी या ऑडिओ क्लिपची गंभीर दखल घेतली आहे.
हेही वाचलंत का ?