Saif Al Adel : इजिप्शियन सैन्यातील ‘हा’ माजी ‘कर्नल’ होणार अल कायदाचा म्होरक्या | पुढारी

Saif Al Adel : इजिप्शियन सैन्यातील ‘हा’ माजी ‘कर्नल’ होणार अल कायदाचा म्होरक्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीचा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर अल कायदाचा पुढचा प्रमुख कोण असेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर कदाचित पूर्णपणे स्पष्ट होणार नाही, परंतु ओसामा बिन लादेन आणि अल जवाहिरी यांच्यापेक्षा सर्वाधिक चर्चिले जाणारे नाव अधिक धोकादायक आहे. सैफ अल अदेल (Saif Al Adel) असं त्याचं नाव आहे.

अमेरिकेने अफगाणिस्तानात ड्रोन हल्ला करत अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीचा खात्मा केला. ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असणारा जवाहिरी हा ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल-कायदाच नेतृत्व करत होता. मोस्ट वॉंटेड अल जवाहिरीवर अमेरिकेने २५ मिलियन डॉलरचे बक्षिस ठेवले होते. जवाहिरीने ९/११ हल्ल्यामध्ये समन्वय साधण्याचे काम केले होते. या हल्ल्यात ३००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. २०११ मध्ये जवाहिरीला अल कायदाचा प्रमुख बनवण्यात आले होते. आता त्याच्या मृत्यूनंतर अल कायदा दहशतवादी संघटनेसमोर नेतृत्वाचे संकट आहे.

मिडल ईस्ट इन्स्टिट्यूटच्या मते, आता अल कायदाची कमान सैफ अल-अदेल (Saif Al Adel) याच्याकडे जाऊ शकते. इजिप्तचा हा माजी लष्करी अधिकारी अल कायदाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. तो अल-जवाहिरीचा दुसरा महत्त्वाचा कमांडर आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनुसार, सैफ अल-अदेल १९८० च्या दशकात मकतब अल-खिदमत या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. इजिप्शियन सैन्यात तो कर्नल म्हणून कार्यरत होता. सध्या तो ६२ वर्षांचा आहे. मोगादिशूमध्ये चाललेल्या ‘ब्लॅक हॉक डाउन’ या ऑपरेशनचा तो प्रमुख होता. त्यात १९ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अल-अदेल ३० वर्षांचा होता.

अमेरिकन सैनिकांची हत्या, अमेरिकेच्या नॅशनल डिफेन्स युटिलिटीज नष्ट करणे आणि १९९८ मध्ये केनियातील अमेरिकन दूतावासावर हल्ला करण्याचा कट रचण्याचा त्याच्यावर आरोप आहे. पूर्व आफ्रिकेतील दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. अदेलसह (Saif Al Adel) अब्दुल-रहमान अल-मगरबी हा जवाहिरीचा जावईही अल कायदाच्या उत्तराधिकारीच्या रेसमध्ये आहे.

सैफ अल-अदेलने (Saif Al Adel) अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि सुदानमधील अल-कायदा आणि इस्लामिक जिहादी सदस्यांना तसेच सोमाली आदिवासींना लष्करी आणि गुप्तचर प्रशिक्षण दिले. अबू तल्हा अल-सुदानी, अबू जाफर अल-मसरी, अबू सलीम अल-मसरी आणि सौफुल इस्लाम अल-मसरी यांच्यासोबत अदेलने दक्षिण लेबनॉनला प्रवास केला. जिथे त्याने हिजलुल्लाह अल-हज्जाजसोबत प्रशिक्षण घेतले. सैफ अल-अदेलने दहशतवाद्यांना भरती करताना स्फोटके कशी हाताळायची हेही शिकवले. २९ फेब्रुवारी २०२१ रोजी, इजिप्शियन अधिकाऱ्यांनी अदेल नावाच्या एका व्यक्तीला कैरो विमानतळावर अटक केली होती. मात्र नंतर हे उघड झाले की तो अदेल नव्हता. अदेल एकेकाळी ओसामा बिन लादेनचा सुरक्षा प्रमुख होता. तो २००१ पासून एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये आहे. त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यासाठी १० मिलियन डॉलरचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

Back to top button