Shinzo Abe : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे भारताशी होते खास नाते, जाणून घेऊया त्यांच्याविषयी

Prime Minister Shinzo Abe's relationship with India
Prime Minister Shinzo Abe's relationship with India
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात हल्ला झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दरम्यान, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे वृत्त जपानमधील NHK WORLD News ने दिले आहे. भारत-जपान संबंध दृढ करण्यात शिंजो अबे यांची महत्त्वाची भूमिका आहे. पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत सर्वाधिक तीनवेळा भारताला भेट देणारे ते पहिले जपानी पंतप्रधान होते. जपानला भारताचा विश्वासार्ह मित्र आणि आर्थिक सहयोगी बनवण्यात माजी पंतप्रधान शिंजो अबे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जपान, भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शिंजो आबे यांनी २००७ पासून चतुर्भुज सुरक्षा संवाद सुरू केला.

ऑगस्ट २००७ मध्ये त्यांनी सर्वप्रथम भारत दौरा केला होता. यावेळी त्यांनी भारताच्या संसदेसमोर आपले विचार मांडताना भारत हा जपानचा विश्वासार्ह भागीदार असेल, असे ठासपणे सांगितले. या भेटीदरम्यान त्यांनी दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण द्विपक्षीय संबंधांच्या दीर्घ इतिहासावर आधारित नवीन द्विपक्षीय आशियाई आघाडीला सहमती दिली होती. भारताबरोबर व्यापारी राजकीय व सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान शिंजो अबे यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले होते. आपल्या कार्यकाळात तब्बल तीन वेळा भारताचा दौरा करणारे ते पहिलेच जपानी पंतप्रधान होते. सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शिंजो आबे यांना भारताने २०२१ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

भारताबरोबरच ऑस्ट्रेलियाशी राजनैतिक आणि आर्थिक संबंध वृद्धिंगत करून आग्नेय आशियात नव्या समीकरणांना त्यांनी चालना दिली. आशिया खंडात भूराजकीय समतोल साधणे हे कठीण काम होते. परंतु भारत, चीन, जपान आणि दक्षिण आशियातील देशांचे संबंध या पार्श्वभूमीवर आबे यांनी इंडो पॅसिफिक व्हिजन मांडले.

आबे यांच्या निधनाने धक्का बसला : पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिंजो आबे हे माझ्या जवळच्या मित्रांपैकी एक होते. त्यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले असून, मला प्रचंड मोठा धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. आबे हे एक जागतिक राजकारणी, नेते आणि उत्तम प्रशासक होते. त्यांनी त्यांचं आयुष्य जपान आणि जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी समर्पित केलं होतं, असं मोदी म्हणाले. आबे यांच्याबरोबर नुकतीच टोकियो येथे झालेल्या भेटीचे छायाचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे. तसेच भारत-जपान संबंध दृढ करण्यासाठी शिंजो आबे यांनी जपान-भारत असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे.

२००६ मध्ये शिंजो अबे हे पहिल्यांदा जपानचे पंतप्रधान झाले. महायुद्धानंतर जपानमधील पंतप्रधानांमध्ये ते सर्वात तरुण पंतप्रधान होते. २००६ ते २००७ असा एक वर्ष आणि नंतर २०१२ ते २०२० पर्यंत ते जपानचे पंतप्रधान होते. तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. पण जपान या आशियातील बलाढ्य राष्ट्राचे सर्वाधिक काळ पंतप्रधान होते. जपानमध्ये आर्थिक सुधारणा करण्यासाठी त्यांनी बरीचशी कामे केली. दुसऱ्या महायुद्धात कमकुवत झालेल्या जपानला लष्करीदृष्ट्या सामर्थ्यशाली बनविण्यासाठी त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रयत्न केले. दुसऱ्या महायुद्धाचे कटू अनुभव सोसलेल्या जपानने बराच काळ आपल्या संरक्षण विषयक भूमिका सीमित ठेवल्या होत्या. पण शिंजो आबे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर जपानच्या संरक्षण व्यवस्थेला नवसंजीवनी देण्याचे कार्य केले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच त्यांनी जपानी सैनिकांना परदेशी भूमीवर लढण्यासाठी पाठवण्यास मान्यता दिली, ही त्यांच्या कारकिर्दीतील मोठी नोंद आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news