व्‍हिडिओ : श्रीलंका पंतप्रधानांच्‍या ‘खुर्ची’ला जवानांची सुरक्षा! राष्‍ट्रपती गोटाबाया आज राजीनाम्‍याची घोषणा करणार? | पुढारी

व्‍हिडिओ : श्रीलंका पंतप्रधानांच्‍या 'खुर्ची'ला जवानांची सुरक्षा! राष्‍ट्रपती गोटाबाया आज राजीनाम्‍याची घोषणा करणार?

कोलंबो; पुढारी ऑनलाईन :
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी मालदीवला पलायन केल्‍यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर झाली आहे. संतप्‍त आंदोलकांनी राष्‍ट्रपती आणि पंतप्रधानांच्‍या कार्यालयावर हल्‍लाबोल केल्‍याने आंदोलक आणि लष्‍कराचे जवान आमने-सामने आहेत. आंदोलकांनी राष्‍ट्रपती निवासात धुगगूस घातल्‍याचे व्‍हिडीओही व्‍हायरल झाले आहे. आंदोलक पंतप्रधानांच्‍या ‘खुर्ची’वर कब्‍जा करु नये, यासाठी सुरक्षा जवान तैनात करण्‍यात आले आहेत.

राष्ट्रपती गोटाबाया आज मालदीवमधून सिंगापूरला जाणार

देशाला आर्थिक संकटाच्‍या खोईत सोडून श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पलायन केले आहे. त्‍यांनी मालदीवची राजधानी माले येथे आश्रय घेतला आहे. आज गोटाबाया हे सिंगापूरला जाणार असून, तेथूनच ते आपल्‍या पदाच्‍या राजीनाम्‍याचा देण्‍याची शक्‍यता आहे. मालदीवमध्‍ये त्‍यांना नेण्‍यासाठी एका खासगी जेट विमान सिंगापूरला दाखल झाले आहे. यासाठी त्‍यांना मालदीवचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष मोहम्‍मद नाशीद यांनी मदत केल्‍याचे सूत्रांनी सांगितले. दरम्‍यान, अद्‍याप गोटाबाया यांनी आपल्‍या पदाचा अधिकृत राजीनामा दिलेला नाही, असे श्रीलंका संसदेच्‍या सभापती कार्यालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

अस्थिर श्रीलंका (Video) : राष्ट्रपती भवनावर आंदोलकांचा ताबा, स्विमिंग पूलमध्ये डुबक्या, शाही किचनमध्ये जेवण, बेडरूममध्ये विश्रांती

संकट काळात भारताची मदत : प्रेमदासा

श्रीलंका गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे, अशा काळात आम्‍हाला चीनने कोणतीही आर्थिक मदत केली नाही. संकटकाळी आम्‍हाला भारताने सर्वोतोपरी मदत केली आहे. भारताने धान्‍य आणि औषधांचा पुरवठा करुन आम्‍हाला खूपच मदत केली आहे, असे राष्‍ट्रपती पदासाठी आघाडीवर असणारे विरोधी पक्ष नेते साजिथ प्रेमदासा यांनी म्‍हटले आहे. दरम्‍यान, कोलंबोमधील संचारबंदी ही सायंकाळी पाचनंतर हटविण्‍यात येणार असल्‍याची घोषणा प्रशासनाने जाहीर केले आहे.

आंदोलकांनी केला होता राष्‍ट्रपती, पंतप्रधान कार्यालयावर हल्‍ला

राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पलायन केल्यानंतर काही वेळानंतर हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले. त्यांनी संसद आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवला. आंदोलकांना श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या कार्यालयावर हल्ला केला. यामुळे येथील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कोलंबोमधील आंदोलकांना रोखण्यासाठी लष्करी जवानांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. आम्हाला नवीन राष्ट्रपती आणि पंतप्रधान मिळेपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही,” अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

राष्‍ट्रपती निवासावर हल्‍लाबोल

राष्ट्रपती भवनात आंदोलकांनी मौजमजा केल्याची छायाचित्रे, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. जगभरात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी चक्क राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसून फोटो काढले, तर काही आंदोलक येथील शाही किचनमध्ये जेवतानाही दिसत आहेत. काही जणांनी राष्ट्रपतींच्या शयनकक्षातील बेडवर विश्रांतीचा आनंदही घेतला होता.

हेही वाचा : 

 

 

Back to top button