कोलंबो; वृत्तसंस्था : श्रीलंकेतील राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवलेल्या आंदोलकांनी या निवासस्थानी चांगलीच मौजमजा केली. अजूनही ही मौज सुरू आहे आणि त्याचे फोटोज, व्हिडीओजही जगभर व्हायरल झाले आहेत. यात काही लोक राष्ट्रपती भवनातील स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा, डुंबण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. जगभरात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी चक्क राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसून फोटो काढले, तर काही आंदोलक येथील शाही किचनमध्ये जेवतानाही दिसत आहेत. काही जणांनी राष्ट्रपतींच्या शयनकक्षातील बेडवर विश्रांतीचा आनंदही घेतला.
गेल्या तीन महिन्यांपासून राजकीय आणि आर्थिक अस्थैर्याचा सामना करत असलेल्या श्रीलंकेत आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानावर ताबा मिळवला होता. त्यानंतर आज रविवारी येथे आंदोलकांना नोटांची लाखो रुपयांची बंडले आढळून आली आहेत. श्रीलंकेच्या चलनात 1.78 कोटी रुपयांची ही रोकड आहे. हा संपूर्ण पैसा आंदोलकांनी सैन्याकडे सोपवला आहे. अनेक भागांत संचारबंदी लोकांचे जत्थेच्या जत्थे राजधानी कोलंबोकडे येत आहेत. त्यामुळे एकूण येथे सर्वत्र अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेतील परिस्थिती पाहून पोलिसांनी अनेक भागात संचारबंदी लागू केली आहे.
चुकीची धोरणे, भ्रष्टाचार आणि विचित्र निर्णयांची शिकार बनलेला श्रीलंका हा छोटेखानी देश सध्या भुकेकंगाल बनला आहे. पाच प्रमुख कारणांमुळे त्या देशाची अवस्था दयनीय झाली असून तेथे अराजक माजले आहे.