श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंनी अखेर देश सोडला, मालदीवमध्ये घेतला आसरा | पुढारी

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंनी अखेर देश सोडला, मालदीवमध्ये घेतला आसरा

कोलंबो : पुढारी ऑनलाईन; आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी अखेर देश सोडला आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हवाई दलाच्या विमानाने देश सोडून निघून गेले आहे. गोटाबाया राजपक्षे, त्यांची पत्नी आणि दोन अंगरक्षकांसह मालदीवची राजधानी माले येथे दाखल झाले आहेत, असे श्रीलंकेच्या सूत्रांनी कोलंबोमध्ये सांगितले. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडल्याची पुष्टी श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाने केली आहे

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना मालदीवला जाण्यास इमिग्रेशनसाठी संरक्षण मंत्रालय, सीमाशुल्क विभागाकडून परवानगी देण्यात आली होती. आज १३ जुलैच्या पहाटे त्यांना हवाई दलाचे विमान उपलब्ध करुन देण्यात आले, अशी माहिती श्रीलंकन हवाई दलाच्या मीडिया संचालकांनी सांगितले. दरम्यान, वेलाना विमानतळावर दाखल झालेल्या राजपक्षेंचे मालदीव सरकारच्या प्रतिनिधीने स्वागत केल्याचे समजते.

“राष्ट्रपती पळून गेल्याचा आम्हाला आनंद नाही. ते तुरुंगात असायला हवे होते, ” असे राष्ट्रपती कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या २५ वर्षीय आंदोलक मलिक डिसूझा यांनी म्हटले आहे. ते गेल्या ९७ दिवसांपासून आंदोलनात सक्रिय आहेत. राजपक्षे यांनी देश उद्ध्वस्त केला आणि आमचा पैसा चोरला. आम्हाला नवीन राष्ट्रपती आणि पंतप्रधान मिळेपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही,” असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

श्रीलंकेत गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटात राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे देश सोडून गेले आहेत. दरम्यान, गोटाबाया यांनी अधिकृतरीत्या राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना माहिती दिली आहे. राष्ट्रपती घोषणेनुसार राजीनामा देतील, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. राष्ट्रपती भवनातील पहिल्या मजल्यावर लाकडी कपाटासमोर गुप्‍त बंकरचा व्हिडीओ समोर आला होता. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे याच मार्गाद्वारे राष्ट्रपती निवासस्थानातून बाहेर पडले.

जोपर्यंत राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आंदोलक राष्ट्रपती भवनातच ठाण मांडून राहणार आहेत, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. राष्ट्रपती भवनात आंदोलकांनी मौजमजा केल्याची छायाचित्रे, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

श्रीलंकेतील राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवलेल्या आंदोलकांनी या निवासस्थानी चांगलीच मौजमजा केली. अजूनही ही मौज सुरू आहे आणि त्याचे फोटोज, व्हिडीओजही जगभर व्हायरल झाले आहेत. यात काही लोक राष्ट्रपती भवनातील स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा, डुंबण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. जगभरात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी चक्क राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसून फोटो काढले, तर काही आंदोलक येथील शाही किचनमध्ये जेवतानाही दिसत आहेत. काही जणांनी राष्ट्रपतींच्या शयनकक्षातील बेडवर विश्रांतीचा आनंदही घेतला.

Back to top button