Rajapaksa : श्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांचा राजीनामा,’आणीबाणी’त नवे राजकीय संकट | पुढारी

Rajapaksa : श्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांचा राजीनामा,'आणीबाणी'त नवे राजकीय संकट

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

श्रीलंकेत आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात आणीबाणी लागू करण्‍यात आली आहे. अशातच आता पंतप्रधान महिंदा राजपक्षे ( Mahinda Rajapaksa ) यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा राष्‍ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्‍याकडे दिला आहे.

महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्‍यानंतर आरोग्‍य मंत्री प्रो. चन्‍ना जयसुमना यांनीही आपलं पद सोडलं आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्‍या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलक आणि सरकार समर्थकांमध्ये आज सकाळी  जोरदार संघर्ष झाला. यानंतर देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला. देशातील वाढत्‍या हिंसाचारामुळे अखेर महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला असल्‍याचे मानले जात आहे.

Rajapaksa : हिंसा केवळ हिंसेला जन्‍म देते

राजीनामा दिल्‍यानंतर राजपक्षे यांनी  ट्‍विट केलं आहे की, ” देशातील नागरिकांना संयम पाळावा. जेव्‍हा भावनिकदृष्‍ट्या आपण विचार करतो तेव्‍हा नेहमी लक्षात ठेवायला हवे की, हिंसा केवळ हिंसेला जन्‍म देते. देशावर आलेल्‍या आर्थिक संकटाला एक आर्थिक समाधान मिळण्‍याची गरज आहे. देशावर आलेल्‍या आर्थिक संकटावर मात करण्‍यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. ”

श्रीलंकेत कर्फ्यू लागू, सरकार समर्थक-आंदोलकांत जोरदार धुमश्चक्री

सोमवारी संपूर्ण श्रीलंकेत अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रवक्त्यांकडून देण्यात आली.दरम्यान, आंदोलक आणि सरकार समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षात सुमारे २० जण जखमी झाले आहेत. आंदोलक ९ एप्रिलपासून राष्ट्रपतींच्या कार्यालयाबाहेर तळ ठोकून बसले आहेत. त्यांच्यावर राजपक्षे यांच्या समर्थकांनी काठ्या आणि शस्त्रांनी हल्ला केला. यामुळे दोन गटात जोरदार धुमश्चक्री झाल्याचे वृत्त AFP वृत्तसंस्थेने दिले आहे.

राजपक्षे समर्थकांनी सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी उभारलेले तंबू आणि इतर अडथळे तोडून हल्ला केला. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. यामुळे पोलिसांनी सरकारच्या समर्थकांना रोखण्यासाठी अश्रूधूर आणि पाण्याच्या मारा केला. यावेळी झालेल्या संघर्षात मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत.

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ:

 

Back to top button