Sri Lanka crisis : श्रीलंकेत अराजकता! संपूर्ण देशात कर्फ्यू लागू, सरकार समर्थक-आंदोलकांत जोरदार धुमश्चक्री | पुढारी

Sri Lanka crisis : श्रीलंकेत अराजकता! संपूर्ण देशात कर्फ्यू लागू, सरकार समर्थक-आंदोलकांत जोरदार धुमश्चक्री

कोलंबो; पुढारी ऑनलाईन

Sri Lanka crisis : श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलक आणि सरकार समर्थकांमध्ये सोमवारी जोरदार संघर्ष झाला. यामुळे सोमवारी संपूर्ण श्रीलंकेत अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रवक्त्यांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, आंदोलक आणि सरकार समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षात सुमारे २० जण जखमी झाले आहेत. आंदोलक ९ एप्रिलपासून राष्ट्रपतींच्या कार्यालयाबाहेर तळ ठोकून बसले आहेत. त्यांच्यावर राजपक्षे यांच्या समर्थकांनी काठ्या आणि शस्त्रांनी हल्ला केला. यामुळे दोन गटात जोरदार धुमश्चक्री झाल्याचे वृत्त AFP वृत्तसंस्थेने दिले आहे.

राजपक्षे समर्थकांनी सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी उभारलेले तंबू आणि इतर अडथळे तोडून हल्ला केला. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. यामुळे पोलिसांनी सरकारच्या समर्थकांना रोखण्यासाठी अश्रूधूर आणि पाण्याच्या मारा केला. यावेळी झालेल्या संघर्षात मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. (Sri Lanka crisis)

श्रीलंकेत सध्या सर्वात वाईट आर्थिक परिस्थिती आहे. यामु‍ळे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यासह राजपक्षे कुटुंबातील नेत्यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. देशभरात याआधी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली आहे. जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे.

परकीय कर्जाचा डोंगर, लॉकडाऊन, तीव्र महागाई, इंधन पुरवठ्यातील तुटवडा, परकीय चलन साठ्यात झालेली घसरण आणि चलनाचे अवमूल्यन यामुळे देशाच्या आर्थिक विकासावर विपरित परिणाम झाला आहे. श्रीलंकेला या वर्षी ७ अब्ज डॉलर परदेशी कर्जाची परतफेड करायची आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोरोना काळापूर्वीच संकटात सापडली होती. लॉकडाउनमुळे त्यात आणखी भर पडली. त्याचा असंघटित क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. ज्यात सुमारे ६० टक्के कर्मचार्‍यांचा वाटा आहे.

Back to top button