कर्नाटक : वादग्रस्त फोटोमुळे हुबळीत हिंसाचार | पुढारी

कर्नाटक : वादग्रस्त फोटोमुळे हुबळीत हिंसाचार

हुबळी : पुढारी वृत्तसेवा
एका प्रार्थनास्थळावर भगवा ध्वज फडकत असल्याचे चित्र एका युवकाने समाज माध्यमांवर प्रसिद्ध केल्यानंतर जुने हुबळी येथे दगडफेक, जाळपोळ झाली. यामध्ये 12 पोलिस जखमी झाले असून, सुमारे 50 वाहनांचे नुकसान झाले. परिसरातील मंदिरावरही तुफान दगडफेक करून नुकसान करण्यात आले. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी सुमारे 105 जणांना अटक करण्यात आली असून 20 एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. वादग्रस्त फोटोबद्दल अभिषेक हिरेमठ नामक युवकास पोलिसांनी अटक केली आहे.
रात्री एकाचवेळी जुने हुबळी परिसरात शेकडो लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी तुफान दगडफेकीला सुरुवात केली. मंदिर, पोलिस स्थानक, रुग्णालयांना या जमावाने लक्ष्य बनवले. यामध्ये इमारतींच्या काचा फुटल्या. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिस घटनास्थळी रवाना झाले. पण, जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक सुरू केली. यामध्ये बारा पोलिस जखमी झाले. पोलिसांच्या वाहनांसह खासगी वाहनांचे प्रचंड नुकसान करण्यात आले.

परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये दगडफेक करतानाचे द‍ृश्य कैद झाले आहे. याआधारे पोलिसांनी रविवारी सायंकाळपर्यंत 105 जणांना अटक केली. आणखी काहीजणांचा शोध पोलिस घेत आहेत. हुबळी-धारवाड पोलिस आयुक्‍त लालूराम यांनी घटनास्थळी पाहणी केली. विविध समाजातील नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. परिस्थितीवर नियंत्रणासाठी त्यांनी उपाययोजना केल्या. रात्री उशिरापर्यंत त्यांनी संवेदनशील भागाचा दौरा केला. सर्वांना शांततेचे आवाहन केले.

तीस वर्षांनंतर पुन्हा वाद

तीस वर्षांपूर्वी येथे इदगाह मैदानाचा वाद होता. अनेक वर्षे हा वाद वाढतच होता. कायदेशीरपणे हा वाद सोडवण्यात यश मिळाले होते. तीस वर्षांनंतर आता पुन्हा दंगल झाल्याने शहरवासीयांमध्ये भीती निर्माण झाली आहे. जुने हुबळीत अचानक तुफान दगडफेक सुरू झाली. त्यासाठी दगड कुठून आले? ते कसे आणण्यात आले? याविषयी कसून चौकशी केली जाणार असल्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले. होस्पेट येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, हुबळीतील स्थितीची सविस्तर माहिती घेतली आहे. शांतता बिघडवणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. कुणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये. घटना घडल्यानंतर केवळ दीड तासांमध्ये पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवले. वादग्रस्त पोस्ट करणार्‍यावरही कारवाई करण्यात आली आहे. सुमारे हजार लोकांनी एकाचवेळी येऊन पोलिस स्थानकाला घेराव घालण्याचा कट रचल्याचे दिसून आले आहे. पोलिसांवर केलेला हल्‍ला कधीही सहन केला जाणार नाही.

Back to top button