Viral Story : बाप रे! चहाच्‍या पेटीत लपवलेले 'ते' पुस्तक १५० वर्षांनी लायब्ररीत पोहोचले; दंडाची रक्कम ऐकाल तर चक्रावून जाल!

ऑस्ट्रेलियातील सार्वजनिक वाचनालयातील कर्मचार्‍यांनी अनुभवली अत्यंत दुर्मिळ घटना
Library Book Late Fee Viral Story
रॉस सिमोन्स (वय ७७) हे त्यांच्या वडिलोपार्जित घराचे नूतनीकरण करत असताना त्यांना तब्‍बल १५० वर्षांपूर्वीचे पुस्तक सापडले.
Published on
Updated on

Library Book Late Fee Viral Story : ९० च्या दशकात ग्रंथालयातून (लायब्ररी) आवडीचं पुस्तक घरी आणणं, ते वाचण्यात गुंग होऊन परत करायचा दिवस विसरणं आणि मग त्‍याचा जो काही किरकोळ 'दंड' असेल तो भरणं... हा वाचनप्रेमींच्‍या जगण्याचा भाग होता! काळाच्या ओघात सगळंच बदललं. आज तंत्रज्ञानाच्या गर्दीत ग्रंथालयाची ती 'लेट फी' आणि त्यामागच्या गमतीशीर आठवणी मात्र हळूहळू इतिहासाच्या पानात जमा झाल्या आहेत. मात्र लायब्ररीची लेट फीची आठवण ताजी व्‍हावी, अशी दुर्मिळ घटना ऑस्‍ट्रेलियात घडली आहे. येथील एका सार्वजनिक वाचनालयात तब्बल १५० वर्षे उशिराने एक पुस्तक वाचनालयात परत आले असून, वाचनालयाच्या जुन्या नियमांनुसार या पुस्तकाची लेट फी (दंड) काढल्यास ती थेट २८,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतकी झाली आहे!

पुस्‍तक १८५८ मध्‍ये प्रकाशित

'अँटीक्विटीज ऑफ अथेन्स' (Antiquities of Athens) नावाचे हे दुर्मिळ पुस्तक १८५८ मध्ये प्रकाशित झाले होते. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियातील 'कियामा लायब्ररी'मध्ये (Kiama Library) हे पुस्तक परत करण्यात आले.

Library Book Late Fee Viral Story
Google Earth AI tool : गुगलने काही तासांतच बंद केले Earth AI टूल! काय आहे कारण?

चहाच्या पेटीत आणि भिंतीच्या मागे होते पुस्तक

स्थानिक नागरिक रॉस सिमोन्स (वय ७७) हे त्यांच्या वडिलोपार्जित घराचे नूतनीकरण करत असताना त्यांना हे पुस्तक सापडले. एका जुन्या भिंतीमागे चहाच्या लाकडी पेटीत हे पुस्तक ठेवलेले होते. कित्येक दशके बंद राहिल्यामुळे दमट हवेने पुस्तकाचे थोडे नुकसान झाले आहे.

पणजोबांनी आणलेले पुस्‍तक लागले हाती

रॉस सिमोन्स यांनी म्‍हटलं आहे की, त्यांचे पणजोबा जॉन सिमोन्स यांनी १८७० च्या दशकात हे पुस्तक वाचनालयातून आणले असावे. "आमच्या वाचनालयात इतक्या वर्षांनंतर एखादी वस्तू किंवा पुस्तक परत येण्याची ही पहिलीच वेळ आहे," असे कियामा लायब्ररीच्या व्यवस्थापक मिशेल हडसन यांनी आपला आनंद व्‍यक्‍त करताना सांगितले.

Library Book Late Fee Viral Story
MOSQUITO BITE STUDY | काही लोकांनाच डास जास्त का चावतात? 'या' एका घटकाचा सारा 'खेळ'; पाहा काय सांगतं संशोधन!

१६ लाखांचा दंड कसा झाला?

कियामा वाचनालयाची सुरुवात १८७२ मध्ये झाली होती. त्या काळातील वाचनालयाच्या सुमारे १,००० पुस्तकांच्या संग्रहात या पुस्तकाचा क्रमांक ५०६ असा होता. पुस्तकाच्या आतील पानावर तत्कालीन नियमांनुसार दर आठवड्याला ३ पेन्स (थ्री पेन्स) इतका विलंब शुल्क आकारण्याचा नियम छापलेला होता. याच हिशोबाने आजची थकीत रक्कम तब्बल १६ लाख रुपये होते!तथापि, त्या काळातील वाचकांची नोंद वही गहाळ झाल्यामुळे हे पुस्तक शेवटचे कोणी नेले होते, याचा अधिकृत पुरावा वाचनालयाकडे नाही.

त्‍या काळात वाचनालयाचे होते काही रंजक नियम

त्या काळात वाचनालयात एक नियम होताउशिरा आणलेले पुस्तक परत करून दंड भरल्याशिवाय नवीन पुस्तक दिले जात नव्हते. हडसन यांनी मिश्‍कीलत म्‍हटलं की, "कदाचित याच भीतीपोटी त्यांनी ते पुस्तक कधी परतच केले नसावे!" त्या काळात वाचनालयाचे इतरही काही रंजक नियम होते.घरातील किमान ६ सदस्यांना वाचता येत असेल, तरच एका वेळी ३ पुस्तके नेण्याची परवानगी होती.नशेत किंवा दारू पिऊन आलेल्या व्यक्तीला वाचनालयात प्रवेश आणि पुस्तके देण्यास सक्त मनाई होती.

Library Book Late Fee Viral Story
Neeraj Chopra : "मी प्रचंड घाबरलो होतो..."; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राचा मोठा खुलासा

"दंड वसूल करून दाखवाच!" रॉस सिमोन्स

पणजोबांनी वाचनालयातून घेतलेल्‍या पुस्‍तकाचे १६ लाखांच्या दंडाबाबत विचारले असता रॉस सिमोन्स मिश्किलपणे म्हणाले, "मी आयुष्यभर ग्राहकांशी व्यवहार केले आहेत. त्यामुळे मला या दंडाची अजिबात भीती वाटत नाही. मी लायब्ररीला स्पष्ट सांगेन तुम्हाला काय करायचे ते करा, मी दंड भरणार नाही!"

आता हे पुस्तक पुन्हा बाहेर जाणार नाही!

हे दुर्मिळ पुस्तक आता लायब्ररीच्या स्थानिक इतिहास विभागाचा एक महत्त्वाचा भाग बनेल आहे. "आम्ही हे पुस्तक आता पुन्हा कोणालाही घरी वाचायला देणार नाही. कारण हे पुस्तक परत येण्यासाठी आम्हाला पुन्हा १५० वर्षे वाट पाहायची नाही!" असे लायब्ररी व्यवस्थापक मिशेल हडसन यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news