

Neeraj Chopra Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ (Commonwealth Games 2026) मधील भालाफेक प्रकारात भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्राने रौप्यपदकावर आपले नाव कोरले. मात्र, या ऐतिहासिक कामगिरीनंतर नीरजने प्रामाणिक खुलासा केला आहे. स्पर्धेदरम्यान प्रत्येक थ्रो करताना आपल्या मनात दुखापतीची प्रचंड भीती होती आणि आपण 'घाबरलेलो' होतो, असे नीरजने प्रांजलपणे सांगितले. सुमारे वर्षभरापासून दुखापतींशी झुंज देत असलेल्या नीरजचे हे मोठ्या आंतरराष्ट्रीय मंचावरील पहिलेच पदक ठरले.
२०२६ च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या भालाफेक (जॅव्हेलिन थ्रो) प्रकारात भारताने उत्कृष्ट कामगिरी करत दोन पदके जिंकली. श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने ८९.७५ मीटर अंतरासह सुवर्णपदक पटकावले, तर भारताच्या नीरज चोप्राने ८५.८३ मीटर अंतरासह रौप्यपदक मिळवले आणि यशवीर सिंगने आपल्या अंतिम प्रयत्नात ८५.४१ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत कांस्यपदक जिंकले.
सामन्यानंतर 'इंडिया टुडे'शी बोलताना नीरज म्हणाला, "माझे कमबॅक योग्य दिशेने सुरू आहे. मी शेवटी भारतीय आहे, त्यामुळे जास्त थंडीत मला सर्वोत्तम कामगिरी करणे थोडे कठीण जाते. पुन्हा एकदा पदक विजेत्यांच्या व्यासपीठावर) उभे राहून खूप आनंद होतोय. मी घेतलेल्या कष्टांचे फळ हळूहळू समोर येत आहे."ग्लास्गोमधील कडाक्याच्या थंडीचा फटका सर्वच खेळाडूंना बसल्याचे नीरजने नमूद केले. "आज माझा केवळ एकच थ्रो चांगला झाला. इतर थ्रो अधिक चांगले होऊ शकले असते, पण भाला हवेत हवा तसा गेलाच नाही," असे तो म्हणाला.
आपल्या दुखापतीबद्दल आणि मानसिक स्थितीबद्दल बोलताना नीरज म्हणाला, " तुम्ही १०० टक्के फिट असाल, तर तुमच्यात कोणत्याही परिस्थितीशी लढण्याची जिद्द असते; पण दुखापत झाली की मन शंकांनी घेरले जाते. मनात एक अनामिक भीती असते. आजच्या स्पर्धेतही मी घाबरलो होतो. मला खूप वेगाने धावून कोणताही धोका पत्करायचा नव्हता. , शरीरावर नियंत्रण ठेवायचे होते. तरीही, जो थ्रो झाला तो समाधानकारक होता." सुवर्णपदक विजेत्या ऋमेश थारंगाचे कौतुक करताना नीरजने सांगितले की, अशा मोठ्या स्पर्धांमध्ये कधीकधी एकच उत्कृष्ट थ्रो पुरेसा ठरतो. ऋमेशने तो एक थ्रो अचूक केला.
पदकासह पुनरागमन झाले असले, तरी अजून सुधारणेला मोठा वाव असल्याचे नीरजने मान्य केले. "या मोसमात मी खूप मोठी झेप घेतली आहे असे मी म्हणणार नाही. माझी कामगिरी यापेक्षाही उत्तम होऊ शकली असती. आता पुढील स्पर्धांमध्ये हळूहळू कामगिरीत अधिक सुधारणा करणे हेच माझे मुख्य ध्येय आहे," असा विश्वासही नीरजने व्यक्त केला.