Google Earth AI tool : गुगलने काही तासांतच बंद केले Earth AI टूल! काय आहे कारण?

एआय टूलमुळे युझर्सना उपग्रह प्रतिमांमध्ये बदल करण्याबरोबरच नव्या प्रतिमा तयार करण्याचे स्वातंत्र्य मिळाले होते.
Google Earth AI tool
Google Earth AI tool :गुगलने हे एआय टूल वैशिष्ट्य जगाचा नव्याने विचार करण्याचा एक मार्ग म्हणून सादर केले होते.(Photos: Google)
Published on
Updated on

Google Earth AI tool : गूगलने ‘गूगल अर्थ’वर (Google Earth) एआयच्या (AI) मदतीने जगाचे रूप बदलण्याची ताकद युझर्सच्या हातात दिली खरी; पण त्याचा परिणाम मात्र अपेक्षेप्रमाणेच अत्यंत चिंताजनक निघाला. गुरुवारी (दि. ३० जुलै) सुरु केलेले हे AI टूल तूर्तास निलंबित करण्याचा निर्णय गूगलने घेतला आहे.

युझर्सनी सुरु केला भलताच गैरवापर

गुरुवारी गूगलने आपल्या 'नॅनो बनाना २' या एआय टूलला गूगल अर्थसोबत जोडले. याद्वारे इंटरनेट युझर्सना उपग्रह प्रतिमांमध्ये हवे तसे बदल करण्याचे किंवा नव्या प्रतिमा तयार करण्याचे स्वातंत्र्य मिळाले होते. गूगलचा उद्देश या टूलच्या माध्यमातून ऐतिहासिक घटना पुन्हा जिवंत करणे किंवा जगाचे नवे रूप कल्पनेने रेखाटणे हा होता. मात्र, इंटरनेटवरील युझर्सनी याचा भलताच गैरवापर सुरू केला. काही तासांतच जगभरात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट, भयानक पूर आणि अगदी इराणमध्ये अण्वस्त्र प्रकल्प उभारल्याचे अत्यंत वास्तववादी बनावट फोटो इंटरनेटवर पसरू लागले.

Google Earth AI tool
European Union Fines Google : 'गूगल'ला युरोपियन युनियनचा मोठा दणका! डिजिटल 'मक्तेदारी'प्रकरणी ८९० दशलक्ष युरोचा दंड!

एकाच क्लिकवर तयार होत होते 'फेक' फोटो

गूगल अर्थ हे एक मोफत प्लॅटफॉर्म असून, त्यावर जगभराची ३डी उपग्रह चित्रे उपलब्ध असतात. 'नॅनो बनाना २' टूलमुळे केवळ एका कमांडवर कोणत्याही परिसराचे चित्र बदलणे शक्य झाले होते. काही युझर्स आपल्या परिसराला एखाद्या सायन्स-फिक्शन चित्रपटासारख्या शहरात बदलू शकत होते. परंतु, जगाचे रूप बदलण्याचे हे स्वातंत्र्य युझर्सना मिळताच त्यांनी कोणताही विचार न करता इतरांची दिशाभूल करू शकतील असे वास्तववादी 'फेक सिन' बनवायला सुरुवात केली.

एआय संशोधकाने दाखवला धोका

एआय संशोधक हेंक व्हॅन एस (Henk van Ess) यांनी दावा केला की, त्यांनी या टूलचा वापर करून इराणमध्ये अणू प्रकल्प आणि गाझामधील एका रुग्णालयाजवळ बॉम्बचा खड्डा तयार केला. हे दोन्ही फोटो सोशल मीडियावर खरे मानले जाऊन वेगाने व्हायरल होऊ शकत होते. याशिवाय, अमेरिकेशी जोडलेल्या मेक्सिको सीमेवर निर्वासितांची प्रचंड गर्दी दाखवणारे चित्रही त्यांनी तयार करून दाखवले. यावर टीका करताना हेंक म्हणाले, "गूगलने गेल्या २० वर्षांत ज्या विश्वासावर जगभरातील माहितीचा मुख्य स्रोत निर्माण केला, त्याच गूगलने आता एका क्लिकवर 'खोट्या गोष्टी' बनवणारे बटण देऊन टाकले आहे."इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर न्यू यॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमान आदळतानाचे (९/११ हल्ल्यासारखे) भीषण बनावट फोटोही युझर्सकडून तयार करून शेअर केले जाऊ लागले.

Google Earth AI tool
Google Employees Quitting: 8 कोटींचं पॅकेजही अपुरं! Google मधील कर्मचारी नोकरी का सोडत आहेत? AI मुळे बदलतंय करिअरचं गणित

गूगलने हे फिचर अचानक मागे का घेतले?

गूगल अर्थ हे संशोधक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. याच्या मदतीने उपग्रह फोटोंची तुलना करून गेल्या २० वर्षांतील शहरी विकास, जंगलांची घट अशा गोष्टींचा अभ्यास केला जातो. 'ओपन-सोर्स इंटेलिजन्स' (OSINT) साठीही याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. अशा वेळी संवेदनशील ठिकाणांचे बनावट फोटो पसरल्यास इंटरनेटवर प्रचंड गोंधळ आणि अफवांचे पीक पिकू शकते. या फोटोंवर 'SynthID' चे वॉटरमार्क असेल आणि ते ओळखता येतील, असा दावा गूगलने केला होता, तरीही धोका टाळण्यासाठी गूगलने हे फिचर तूर्तास निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pudhari

गूगलने स्पष्टीकरणात काय म्हटले?

गूगलने आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) हँडलवर स्पष्टीकरण देताना म्हटले की, "जगाची अचूक माहिती मिळवण्यासाठी लोक गूगल अर्थवर पूर्ण विश्वास ठेवतात. अनेक व्यावसायिकांनी या नव्या फिचरचा चांगला वापर केला; परंतु काही युझर्सनी तयार केलेले स्क्रीनशॉट्स आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारे असल्याचे निदर्शनास आले आहे.आम्ही हे फिचर मागे घेत आहोत. अधिक कडक सुरक्षा नियम लागू केल्यानंतरच हे पुन्हा आणले जाईल. महत्त्वाचे म्हणजे, हे एआय फोटो मूळ गूगल अर्थवर इतरांना दिसत नव्हते आणि त्यावर एआयचे वॉटरमार्कही होते."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news