युक्रेनविरुद्ध रशियाकडून प्रथमच हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर
कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशियाने युक्रेनविरोधात प्रथमच 'किन्झल'(म्हणजे रशियन भाषेत खंजीर)या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर शनिवारी केला. युद्धाच्या 24 व्या दिवशी डागलेल्या या भयंकर क्षेपणास्त्राचा वेग ताशी 12 हजार कि.मी. असून, पश्चिम युक्रेनमधील क्षेपणास्त्रे आणि दारूगोळ्याचे अंडरग्राऊंड गोदाम या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले.
शनिवारी रशियाने डागलेले हायपरसॉनिक क्षेपणास्त्र 2018 मध्ये रशियन लष्करात दाखल झाले होते. हे क्षेपणास्त्र पारंपरिक स्फोटकांसह अणुबॉम्बही वाहून नेण्यास सक्षम आहे. युक्रेनवरील हल्ल्याची पुढील पायरी अणुबॉम्बहल्लाही असू शकते, असा इशारा अमेरिकेने या पार्श्वभूमीवर दिला आहे.
'खंजीर' का आहे खास?
1. व्लादिमीर पुतीन स्वत: किन्झॉल मिसाईलला आदर्श अस्त्र मानतात. कारण त्याची मारकक्षमता 2000 कि.मी.पर्यंत आहे. हे क्षेपणास्त्र अणुहल्लाही करू शकते.
2. 'किन्झल' ध्वनीपेक्षा दहापट वेगाने मारा करते. सेकंदाला 3 कि.मी.पर्यंत अंतर कापते. या अविश्वसनीय वेगामुळे हवाई सुरक्षा यंत्रणा वा कुठलेही रडार त्याबाबतचे पूर्वानुमान करण्यात अपयशी ठरते.
3. या क्षेपणास्त्रातील सेन्सरमुळे ते जमिनीवरून समुद्रातही अचूक मारा करू शकते.