Ukraine Russia War : झेलेन्स्कींच्या बचावासाठी अमेरिकेचा प्लॅन ‘बी’ तयार | पुढारी

Ukraine Russia War : झेलेन्स्कींच्या बचावासाठी अमेरिकेचा प्लॅन ‘बी’ तयार

कीव्ह : युक्रेनची (Ukraine Russia War) राजधानी कीव्हवर रशियाने ताबा मिळविल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे काय होईल, याची चर्चा सुरू झाली आहे. रशियन शार्प शूटर्सपासून झेलेन्स्की यांच्या बचावासाठी अमरिकेने प्लॅन बी तयार केला आहे. युद्धाला सुरवात होऊन 12 दिवस उलटले तरी रशियन फौजा अद्याप झेलेन्स्कींपर्यंत पोहचू शकलेल्या नाहीत.

झेलेन्स्की दररोज त्यांची जागा बदलतात. राजधानी कीव्हमध्येच अनेक सेफ हाऊस बनवले गेले आहेत. झेलेन्स्की यांना युक्रेन सोडावे लागले तर युक्रेनच्या पश्‍चिमेला असलेल्या कार्पेथिया येथे डोंगररांगात असलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यात झेलेन्स्की यांना पाठवले जाईल. त्यांचे निर्वासित सरकार तिथूनच चालवण्याची योजना आहे.

युक्रेनला पाश्‍चिमात्य देशांकडून शस्त्रास्त्र पुरवठा सुरूच ठेवला जाईल. तसेच रशियावर लादलेले आर्थिक निर्बंध हटवले जाणार नाहीत. अशा मार्गाने युक्रेनला मदत केली जाणार आहे. दरम्यान, झेलेन्स्की यांची पत्नी ओलेना यांनीही युक्रेनी नागरिकांना नेहमी धीर देतानाचा व्हिडीओ संदेश जारी केले होते. युक्रेनमध्ये झेलेन्स्की यांच्यानंतर येथील संसदेचे सभापती हे दुसर्‍या क्रमांकाचे नेते मानले जातात. सध्या रूसलान स्टीफानचुक हे सभापती आहे. त्यांनाही सेफ हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे.

रणभूमीतच युक्रेनचे जवान अडकले लग्‍नबंधनात

रशिया-युक्रेन युद्धात (Ukraine Russia War) ऐन रणभुमीतच युक्रेनच्या दोन जवानांनी एकमेकांशी लग्न केले. युक्रेनच्या टेरिटोरियल डीफेन्स फोर्सेची सदस्य लेसिया इव्हाशेंको आणि वेलेरी फायलिमोनोव्ह यांनी कीव्ह शहराच्या बाहेरील एका तपासणी नाक्यावर लग्न केले. दोघांनीही युक्रेनच्या सैन्याच्या पोशाखातच विविध शपथा घेतल्या.

लेसिया आणि वेलेही दोघे एकमेकांना 20 वर्षांपासून ओळखतात आणि दोघांना एक 18 वर्षांची मुलगीही आहे. या लग्नात कीव्हचे महापौरदेखील सहभागी झाले. लग्नानंतर दोघांनी वाईन पिऊन सेलिब्रेशनही केले. तसेच काही वेळानंतर दोघांनीही पुन्ही शस्त्रे उचलून रशियाविरोधातील युद्धाची आघाडी सांभाळली.

Back to top button