वोल्दोमिर झेलेन्स्की म्हणाले, ना माफ करणार, ना विसरणार! | पुढारी

वोल्दोमिर झेलेन्स्की म्हणाले, ना माफ करणार, ना विसरणार!

मॉस्को/कीव्ह : वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धात सोमवारी 12 व्या दिवशीही रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच राहिले. युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. संयुक्‍त राष्ट्राच्या माहितीनुसार आतापर्यंत युक्रेनच्या 15 लाख नागरिकांनी शेजारी देशांमध्ये स्थलांतर केले आहे. या युद्धात अनेक जवान, महिला, बालकांचा मृत्यू झाला आहे. तथापि, युद्धात अत्याचार करणार्‍या सर्वांना धडा शिकविण्याची प्रतिज्ञा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांनी केली आहे. ‘ना माफ करणार, ना विसरणार’, अशी घोषणाच झेलेन्स्की यांनी केली आहे.

देशाला संबोधित करताना वोल्दोमिर झेलेन्स्की म्हणाले की, हे युद्ध म्हणजे जाणीवपूर्वक केलेले हत्याकांड आहे. रशियाने आणखी तोफांचा मारा करण्याचा इशारा दिला आहे. आम्ही हे कधीही विसरणार नाही आणि यात सामील लोकांना माफही करणार नाही. आमच्या भूमीवर अतिक्रमण करून अत्याचार करणार्‍या सर्वांना शिक्षा देणार. पृथ्वीवर स्मशानाशिवाय कोणतीही शांत जागा नसेल. युक्रेनच्या नागरिकांना मुद्दाम लक्ष्य केले जात आहे. शहरे उद्ध्वस्त केली आहेत. सीजफायरवेळीही बॉम्बफेक थांबली नव्हती. त्यामुळे मारियुपोलमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर पडता आले नाही.

दरम्यान, रशियाने युक्रेनमध्ये मंगळवारी युद्धविरामाची घोषणा केली होती. या काळात युद्धात अडकलेल्या निष्पाप लोकांना तिथून बाहेर काढण्यासाठी ह्युमन कॉरिडॉर बनवला जातो. तथापि, अमेरिकेनेही रशिया जाणीवपूर्वक युक्रेनच्या नागरिकांवर हल्ला करत असल्याचे म्हटले आहे.

अमेरिका आणखी निर्बंध लादण्याची शक्यता

युक्रेनवरील हल्ल्यानंतर अनेक देशांनी पुतीन यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. अमेरिकेनेे रशियावर आणखी निर्बंध लावण्याची तयारी केली आहे. युरोपने रशियन खनिज तेलाची आयात करू नये, अशा स्वरूपाचे निर्बंध अमेरिका लागू करू शकते, अशी चर्चा आहे. याआधीच रशियाला स्विफ्ट या बँकिंगप्रणालीतून बाहेर केले गेले आहे.

Back to top button