रशियाकडून युक्रेनमध्ये तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा | पुढारी

रशियाकडून युक्रेनमध्ये तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा

कीव्ह; पुढारी ऑनलाईन

रशियाने युक्रेनमधील दोन शहरांसाठी तात्पुरती युद्धविरामाची घोषणा केली आहे. दक्षिण-पूर्व युक्रेनमधील मारियुपोल आणि वोल्नोवाखा या दोन शहरांमध्ये तात्पुरते युद्ध थांबवले जात आहे. तसेच नागरिकांसाठी मानवतावादी कॉरिडॉर खुला केला जात असल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

शहरांमधून बाहेर पडण्यासाठी मोकळीक दिली आहे, परंतु आम्ही युक्रेनकडून याची पुष्टी केलेली नसल्याचे रशियाने म्हटले आहे. मारियुपोल हे एक युक्रेनमधील प्रमुख बंदर शहर आहे. अनेक दिवसांपासून रशियन सैन्याने याला वेढा दिला आहे. वोल्नोवाखा येथे रशिया आणि युक्रेन सैन्यांमध्ये जोरदार लढाई सुरु आहे.

मारियुपोल शहराची रशियन सैन्याने नाकाबंदी केली आहे. या पार्श्वभूमीवर मारियुपोलच्या महापौरांनी नागरिकांना शहर सोडण्यासाठी परवानगी देण्याचे आवाहन केले होते.

रशियाचे गेल्या १० दिवसांपासून युक्रेनवर हल्ले सुरु आहेत. यात मोठी जीवितहानी झाली आहे. युक्रेनमधील दहा लाखांहून अधिक लोकांनी देश सोडून शेजारील देशांत आश्रय घेतला आहे. युक्रेनवर आक्रमण केल्यापासून रशियाने आठवडाभरात ५०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. रशिया दररोज विविध प्रकारची सुमारे दोन डझन क्षेपणास्त्रे युक्रेनवर डागत आहे, असे वृत्त The Kyiv Independent या युक्रेनमधील मीडियाने पेंटागॉनच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, मोठ्या लष्करी ताफ्यासह रशियन सैन्य युक्रेनमधील अनेक मोठ्या शहरांवर हल्ले करत आहे.

“येत्या काही दिवसांत अधिक मृत्यू आणि विध्वंस होण्याची शक्यता आहे.” अशी भिती नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी नाटो आणि ब्रुसेल्समधील युरोपियन सहभागी देशांसोबत झालेल्या बैठकीत हीच चिंता व्यक्त केली आहे.

रशियाने युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करून त्याचा ताबा घेतल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने शुक्रवारी तातडीची बैठक घेतली. रशियाच्या गोळीबारामुळे अणुऊर्जा प्रकल्पावर आग लागली होती. पण ही आग विझवण्यात आली. त्यातून रेडिएशन लीक झालेला नसल्याने तूर्त धोका टळला आहे.

हे ही वाचा :

Back to top button