वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये का जातात? | पुढारी

वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये का जातात?

युक्रेनमध्ये एमबीबीएस होण्यासाठी दरवर्षी केवळ 3 ते 4 लाख शुल्क भरावे लागते. म्हणजेच संपूर्ण अभ्यासक्रम 15 ते 20 लाखांत होतो. बिहारमध्ये खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा वार्षिक खर्च 20 लाख रुपये आहे.

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या भयावह लढाईत एका भारतीय विद्यार्थ्याला जीवाला मुकावे लागले. भारताने यापूर्वी युद्धे आणि नैसर्गिक आपत्तींमधून नागरिकांना मायदेशी आणण्याच्या अनेक यशस्वी मोहिमा राबविल्याने युक्रेनमधील बहुतांश विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आपल्याला यश मिळेल, अशी सर्वांनाच आशा आहे. परंतु, या निमित्ताने भारतीयांच्या मनात काही प्रश्नही निर्माण झाले आहेत. ते म्हणजे, युक्रेनमध्ये एकंदर भारतीय विद्यार्थी आहेत तरी किती? आणि इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यास का जातात?
एका अंदाजानुसार, युक्रेनमध्ये सध्या सुमारे 20,000 भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय राजदूताने ही आकडेवारी दिली होती. यातील अधिकांश विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत विद्याशाखांमध्ये शिक्षण घेत आहेत.

उदाहरणार्थ, एमबीबीएस, डेन्टल, नर्सिंग इत्यादी. सुमारे 2 ते 3 हजार भारतीय विद्यार्थी तर अशा भागात आहेत, जिथे युक्रेनच्या सीमा रशियाला भिडतात. रशियाने या सीमावर्ती भागात सुमारे 1.30 लाख सैनिक आणि प्रचंड युद्धसामग्री तैनात केली आहे.

भारतात एमबीबीएस करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी विविध वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून 88 हजार जागा उपलब्ध आहेत. 2021 चा विचार करता त्या वर्षी या जागांसाठी झालेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेला सुमारे 8 लाख विद्यार्थी बसले होते. म्हणजेच, सुमारे 7 लाख विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न दरवर्षी अधुरे राहते. दुसरी बाब अशी की, भारतातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत शिक्षणाचा खर्च अफाट आहे. येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा एकंदर खर्च सुमारे एक कोटीच्या घरात जातो. त्या तुलनेत युक्रेनमध्ये हे शिक्षण स्वस्त आहे. तेथील सुविधाही तुलनात्मकद़ृष्ट्या अधिक चांगल्या आहेत. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याचा एकंदर खर्च 25 लाखांच्या आसपास असतो. याखेरीज तेथे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कठोर प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही आणि लाचखोरीही तेथे चालत नाही.

तिसरे महत्त्वाचे कारण असे की, युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम उत्तीर्ण केल्यानंतर भारतात व्यवसाय करायचा असेल, तर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएटस् एक्झामिनेशन (एफएमजीई) ही परीक्षा पास केल्यास लगेच तसा परवाना मिळतो. म्हणजेच युक्रेनमधून शिकून भारतात आल्यास रोजगार मिळणार, याची हमी असते. परंतु, रशियाने लादलेल्या युद्धामुळे भारतीय विद्यार्थ्यांवर प्रचंड तणावाखाली बंकरमध्ये राहण्याची वेळ आली. रशियन फौजांनी खारकीव्ह या युक्रेनमधील दुसर्‍या महत्त्वाच्या शहरात केलेले तांडव आपण टीव्हीवर पाहिले. याच शहरात खारकीव्ह नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी आहे. तिथे अनेक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खारकीव्हपासून रशियाची सीमा अवघ्या 35 किलोमीटरवर आहे. खारकीव्हसह सीमेपासून जवळ असलेल्या भागांमधील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतानाही ते सावध पवित्रा घेताना दिसतात. खारकीव्हमधील काही विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माध्यमांना सांगितले की, ‘शहरातील चौकांमध्ये लष्करी रणगाड्यांची चित्रे लावली आहेत. सीमेवर हेलिकॉप्टरची घरघर रात्रंदिवस ऐकू येते. जीवाच्या भीतीने आम्हाला ग्रासले आहे.’

त्यांना मायदेशी परतण्याचा सल्ला दिला असला, तरी पूर्वी भारतात जाण्यासाठी या विद्यार्थ्यांना 80,000 रुपये मोजावे लागत असत. युद्धाचे मळभ दाटताच विमान भाडे 2 लाखांवर गेले. रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, ब्रिटन, नॉर्वे, जपान, डेन्मार्क आदी देशांनीही आपापल्या नागरिकांना परत बोलावले. त्यामुळे युक्रेनमधून बाहेर पडणे अधिक अवघड आणि अधिक महाग होत गेले. अर्थात, भारतीय दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांची माहिती एकत्रित केली. त्यानंतर एक गुगल फॉर्म जारी केला. या फॉर्मच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थ्यांकडून सूचना मागवल्या. स्वतःची पूर्ण माहिती त्यात भरावयाची होती. आपत्कालीन मदत या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीच्या प्रयत्नांची ही सुरुवात होती.  प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना परत आणण्यास सुरुवात झाली, तेव्हा युद्धाची ठिणगी पडली होती. रविवारी 24 विद्यार्थी युक्रेनमधून पाटण्यात पोहोचले. हे सर्वजण वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आहेत.

परदेशांत शिक्षण घेऊन भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना एफएमजीई परीक्षा द्यावी लागतेच शिवाय त्यात उत्तीर्ण होण्यासाठी 50 टक्के गुण आवश्यक असतात, तरीसुद्धा मोठ्या संख्येने विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनसारख्या देशांत जातात याचे प्रमुख कारण म्हणजे तेथील संपूर्ण शिक्षणाच्या खर्चात भारतातील एका वर्षाचेसुद्धा शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही. युक्रेनमध्ये एमबीबीएस होण्यासाठी दरवर्षी केवळ 3 ते 4 लाख शुल्क भरावे लागते. म्हणजेच संपूर्ण अभ्यासक्रम 15 ते 20 लाखांत होतो. बिहारचेच उदाहरण घेतले, तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा वार्षिक खर्च 20 लाख रुपये आहे.

एमबीबीएससाठी नामांकन होण्याच्या वर्षातच 13 ते 20 लाखांचा खर्च करावा लागतो. नामांकनासाठी नीटची परीक्षा देणे बंधनकारक आहे, तसेच खासगी महाविद्यालयांमधील एकूण जागा केवळ 1,050 आहेत. युद्धग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना एअरलिफ्ट करून मायदेशी आणलेही जाईल. परंतु, देशांतर्गत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या खर्चाविषयी गांभीर्याने विचार करण्याचीही वेळ आली आहे. कोरोना साथीत डॉक्टरांची कमतरता जाणवली. ग्रामीण भागात कोणत्याही सुविधा आणि डॉक्टर पुरेशा संख्येने नसल्यामुळे कोरोनाग्रस्तांना जिल्हास्तरावरील कोव्हिड सेंटरमध्ये भरती व्हावे लागत होते. आपल्याकडे डॉक्टरांची कमतरता नेहमी जाणवते. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवली, तर सरकारी जागा वाढतील आणि खासगी महाविद्यालयांना शुल्क कमी करणे भाग पडेल. रशिया-युक्रेन युद्धाच्या निमित्ताने भारतातील वैद्यकीय शिक्षण आणि त्यातील अडथळे हा विषय गांभीर्याने चर्चिला गेला पाहिजे.

– शुभांगी कुलकर्णी,
शिक्षण क्षेत्राच्या अभ्यासक

Back to top button