Russia Ukraine War : हे आहेत पुतीन यांचे विश्‍वासू साथीदार | पुढारी

Russia Ukraine War : हे आहेत पुतीन यांचे विश्‍वासू साथीदार

रशियाने युक्रेनची (Russia Ukraine War) खार्कोव्ह आणि राजधानी कीव्हसह अनेक मोठी शहरे उद्ध्वस्त केली आहेत. रशियन फौजांच्या संपूर्ण ऑपरेशनवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे नियंत्रण आहे. युद्धाबाबतचा कोणताही अखेरचा निर्णय पुतीन यांचाच असतो. तथापि, पुतीन यांच्या सोबतच्या उच्चस्तरीय वर्तुळात त्यांच्या काही अत्यंत विश्‍वासू साथीदारांचाही समावेश आहे. पुतीन यांच्या त्या खास लोकांविषयी…

सेर्गेई शोयगू (Russia Ukraine War)

हे रशियाचे संरक्षणमंत्री असून पुतीन यांची सर्वाधिक मर्जी असलेल्या लोकांपैकी एक आहेत. शोयगू यांच्यावर पुतीन यांचा सर्वाधिक विश्‍वास आहे. दोघे अनेकदा सायबेरियात मासेमारीसाठी गेले आहेत. शोईगू यांचा प्रत्येक सल्ला पुतीन यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. 2014 मध्ये क्रिमियाचा ताबा घेतानाही शोयगू यांची भूमिका महत्त्वाची होती. रशियन गुप्तचर यंत्रणा जीआरयूचे ते प्रभारीही होते.

वेलरी गेरासिमोव्ह

1999 च्या चेचेन युद्धात वेलरी यांनी रशियन फौजेचे नेतृत्व केले होते. अनेक वर्षे ते सैन्यात उच्च पदावर कार्यरत आहेत. सध्या ते रशियाचे चीफ ऑफ जनरल स्टाफ आहेत. युक्रेनवर हल्ला आणि हे ऑपरेशन वेगाने पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती; पण युद्धास सुरुवातीवेळी सैनिकांमध्ये त्यांची कामगिरी खराब राहिल्याने त्यांना बाजूला केले गेले; पण त्यांना फार काळ या घडामोडींपासून बाजूला ठेवता येणार नाही.

निकोलाय पत्रुशेव (Russia Ukraine War)

कित्येक वर्षांपासून पाश्‍चिमात्य देशांना रशियाच्या सीमेपासून लांबच राखण्याचे प्रयत्न करणारे निकोलाय पत्रुशेव पुतीन यांच्याशी प्रामाणिक असलेल्या तीन अधिकार्‍यांपैकी ते एक आहेत. ते रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव आहेत.

सर्गेई नारिश्किन

पुतीन यांच्याशी प्रामाणिक असलेल्या तिघांपैकी दुसरे अधिकारी म्हणजे रशियाचे परराष्ट्र गुप्तचर प्रमुख सर्गेई नारिश्किन यांची सर्व कारकीर्द पुतीन यांच्या सोबत गेली आहे. 1990 मध्ये सेंट पीटस्बर्गपासून ते 2004 पर्यंत पुतीन यांच्या कार्यालयात ते पुतीन यांच्यासोबत सावलीसारखे वावरले आहेत. ते रशियन हिस्टॉरिकल सोसायटीचेही प्रमुख आहेत.

अलेक्झांडर बोर्तनिकोव्ह

बोर्तनिकोव्ह फेडरल सिक्युरीटी सर्व्हिसचे संचालक आहेत. पुतीन यांच्याशी प्रामाणिक असलेल्या तीन अधिकार्‍यांपैकी हे तिसरे. क्रेमलिनच्या (रशियन राज्यकारभाराचे केंद्र) अभ्यासकांच्या मते, रशियाचे सुरक्षा सेवाप्रमुख अलेक्झांडर बोर्तनिकोव्ह यांच्यावर पुतीन यांचा इतका विश्‍वास आहे की, एखादी माहिती त्यांनी सांगितल्यावरच पुतीन त्यावर विश्‍वास ठेवतात.

Back to top button