सांगली : युक्रेनमध्ये युद्ध आणि हजारवाडीत रंगल्या कवायती, हजारो युरोपियन पाहुण्यांचे संचालन | पुढारी

सांगली : युक्रेनमध्ये युद्ध आणि हजारवाडीत रंगल्या कवायती, हजारो युरोपियन पाहुण्यांचे संचालन

सांगली : पुढारी वृत्‍तसेवा : रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे युरोप खंडासह संपूर्ण जग महायुद्धाच्या भितीच्या सावटाखाली आहे. अशावेळी दरवर्षी प्रमाणे हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या युरोपियन पाहुण्यांच्या पलूस तालुक्यातील हजारवाडी गॅस फॅक्ट्री परिसरातील कवायती चर्चेचा विषय ठरल्या. मध्य आशिया, युरोपातून जवळपास सहा हजार किलोमीटरचा प्रवास करत आलेल्या युरोपियन भोरड्या पलुस तालुक्यातील नागठाणे, अंकलखोप, दुधोंडी, बुर्ली, आमणापूर, भिलवडी या ठिकाणी पहायला मिळत आहेत.

हजारवाडी येथील साई गार्डन हॉटेल ते गॅस फॅक्टरी या परिसरात सायंकाळच्या वेळी भोरड्यांच्या कवायती येथील नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. हजारोंच्या संख्येने असलेल्या भोरड्या, मावळतीच्या सोनेरी संधीप्रकाशात कसरती करतानाचा नयनरम्य सोहळा रंगत आहे. बीज प्रसारात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भोरड्यांचे लहान-लहान थवे सकाळपासून फळे, किटक, धान्यांच्या शोधात असतात. संध्याकाळी मात्र स्नान आणि कवायती हा त्यांचा दिनक्रम दिसतो. सूर्य अस्ताला जातांना शिवारातून, झाडांवरून अनेक छोटे- छोटे थवे आवकाशात भिरकावू लागतात. बघता-बघता या थव्यांचे रूपांतर मोठ्या कवायतीत होताना दिसते.

काटेसावर आणि पळसाचे फुल त्यांचे आवडते खाद्य असल्याने त्यांना पळसमैना, गुलाबमैना असेही म्हणतात. या भोरड्या कृष्णेच्या उथळ पाण्यात संध्यास्नान करतात. यानंतर त्यांच्या मुक्‍कामाच्या ठिकाणी, आकाशात त्यांची कवायत चालते. नदीकाठची झाडे, काटेरी बाभळी, वड व पिंपळासारख्या उंच, खासकरून देशी मोठ्या झाडांवर भोरड्या रात्रीचा मुक्‍काम करतात. सूर्य अस्ताला जातांना शिवारातून, झाडांवरून अनेक छोटे- छोटे थवे आवकाशात भिरकावू लागतात. बघता बघता या थव्यांचे रूपांतर मोठ्या कवायतीत होताना दिसते.
पक्षीप्रेमी संदीप नाझरे, आमणापूर

पक्षी आमच्या या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून हजेरी लावत आहेत. गेल्या वर्षी पक्षांची संख्या घटली होती. यंदा मात्र गतवर्षीपेक्षा त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. खासकरून संध्याकाळच्या वेळी या पक्षांच्या किलबिलाटाने हजारवाडीचा परिसर बहरून जात आहे.

– स्थानिक नागरिक

Back to top button