Russia Ukraine Crisis : ‘पुढील २४ तास युक्रेनसाठी सर्वात कठीण’, जाणून घ्‍या आतापर्यंतच्‍या ठळक घडामोडी | पुढारी

Russia Ukraine Crisis : 'पुढील २४ तास युक्रेनसाठी सर्वात कठीण', जाणून घ्‍या आतापर्यंतच्‍या ठळक घडामोडी

कीव्‍ह / मास्‍को : पुढारी ऑनलाईन
रशिया आणि युक्रेन युद्धाचा ( Russia Ukraine Crisis ) आजचा पाचवा दिवस आहे. रशियाने अधिक आक्रमक होत युक्रेनवरील हल्‍ले वाढवले आहेत. या युद्‍धात दोन्‍ही देशांचे मोठे नुकसान होत आहे. रशियन राष्‍ट्राध्‍यक्ष बलादिमीर पुतीन यांनी ‘न्‍यूक्‍लिअर डिटरंट फोर्स’नु हाय अलर्टवर राहावे, असे आदेश रविवारीच जारी केले होते. यानंतर रशियाने युक्रेनची राजधानी कीव्‍हसह खार्किव्‍ह शहरात दोन शक्‍तीशाली स्‍फोट घडवून आणले आहेत. युक्रेनसाठी पुढील २४ तास खूपच कठीण आहेत, असे युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष वोल्‍दिमीर झेलेन्‍स्‍की यांनी म्‍हटलं आहे. जाणून घेवूया रशिया-युक्रेन युद्‍धातील महत्‍वाच्‍या घडामोडी.

आक्रमणाची तीव्रता कमी झाली

युक्रेनियन सैन्याने म्हटले आहे की रशियन सैन्याने आक्रमणाची तीव्रता कमी केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरु आहेत. यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे.

रशियाची युक्रेनच्‍या ५० टक्‍के भूभागावर घुसखोरी

रशियन सैनिकांनी आतापर्यंत युक्रेनच्‍या ५० टक्‍के भूभागावर घुसखोरी केली आहे. युक्रेनकडूनही रशियाला चोख प्रत्‍युत्तर दिले जात आहे. रविवारी बेलारुसचे नेता अलेक़्‍झांडर लुकाशेंको यांनी युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष वोल्‍दिमीर झेलेन्‍स्‍की यांच्‍याशी फोनवर चर्चा केली. रशियाने अणुहल्‍ला करण्‍याचा इशारा देताच युक्रेनने चर्चे सहमती दर्शवली आहे. मात्र झेलेन्‍स्‍की यांनी म्‍हटलं आहे की, ” या चर्चेतून आम्‍हाला अपेक्षा नाही. मात्र आम्‍ही प्रयत्‍न सुरुच ठेवणार आहोत. चर्चा करणार याचा अर्थ आम्‍ही रशिया समोर झुकणार असा होत नाही, याबाबत कोणतीही शंका देशातील नागरिकांनी घेवू नये”.

कीव्‍ह आणि खार्किव्‍ह दोन भीषण स्‍फोट

युद्‍धाच्‍या पाचव्‍या दिवशी रशियाने कीव्‍हवर कब्‍जा मिळवण्‍यासाठी जोरदार प्रयत्‍न सुरु केले आहेत. आज ( दि. २८ )  सकाळी कीव्‍ह आणि खार्किव्‍ह येथे आणखी दोन भीषण स्‍फोट झाले. आतापर्यंत युद्‍धात रशियाच्‍या सुमारे ३५०० सैनिक ठार झाले आहेत. तर २०० हून अधिक जणांना युद्ध बंदी करण्‍यात आले आहे, असा दावा युक्रेनने केला आहे.

Russia Ukraine Crisis : युक्रेनचे ३५२ नागरिक ठार, १ हजार ६८४ जण जखमी

युक्रेनने आत्‍मसमर्पण करण्‍यास नकार दिल्‍याने युद्धाचा भडका आणखी मोठा होताना दिसत आहे. युद्‍धाच्‍या पाचव्‍या दिवशी रशियाने अधिक आक्रमक होत युक्रेनची आणखी कोंडी करण्‍याचा प्रयत्‍न केला. युक्रेन सोमवारी जाहीर केलेल्‍या निवेदनात म्‍हटलं आहे की, मागील चार दिवस रशियाकडून होणार्‍या हल्‍ल्‍यात ३५२ नागरिकांचा मृत्‍यू झाला आहे. यामध्‍ये १४ मुलांचा समावेश आहे. १ हजार ६८४ नागरिक जखमी झाले आहेत. यामध्‍ये ११६ मुलांचा समावेश आहे.

रशियन अण्‍वस्‍त्रे ‘हाय अलर्ट’ वर

युक्रेनने रशियाबरोबर चर्चा करण्‍यास रविवारी सहमती दर्शवली. ही चर्चा बेलारुसच्‍या सीमवर होवू शकते. यापूर्वी रशियन राष्‍ट्राध्‍यक्ष बलादिमीर पुतीन यांनी ‘न्‍यूक्‍लिअर डिटरंट फोर्स’ने हाय अलर्टवर राहावे, असे आदेश दिले. चर्चेपूर्वी पुतीन यांनी दिलेल्‍या आदेश हा युक्रेनसह युरोपीय देशांना धमकी असल्‍याचे मानले जात आहे. पाश्‍चात्‍य देश रशियाविरोधात जाणीवपूर्वक शत्रुतापूर्ण व्‍यवहार करत आहेत. त्‍यामुळेच आम्‍ही न्‍यूक्‍लिअर डिटरंट फोर्स’ने हाय अलर्टवर राहावे, असे आदेश दिले आहेत, असे पुतीन यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

युक्रेनने दिला होता चर्चेला नकार

रशियाने चर्चेचा प्रस्‍ताव ठेवला होता. मात्र युक्रेनने तो फेटाळला. बेलारुसमध्‍ये चर्चा नको, रशियाला खरच गंभीरपणे चर्चा करायची असेल तर त्‍यांना चर्चेचे ठिकाण बदलावे लागेल. त्‍यांनी र्चेसाठी पोलंड, तुर्की हंगेरी, अजरबैजान, स्‍लोवाकिया येथे रशियाने आपले शिष्‍टमंडळ पाठवावे, असे आवाहनही झेलेन्‍स्‍की केले होते.

युक्रेनची रशियाविरोधात आंतरराष्‍ट्रीय न्‍यायालयात धाव

युक्रेनने रविवारी रशियाविरुद्ध आंतरराष्‍ट्रीय न्‍यायालयात ( International Court ) धाव घेतली. युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष वोल्‍दिमीर झेलेन्‍स्‍की यांनी यासंदर्भातील माहिती ट्‍विट करत दिली. युक्रेनच्‍या अध्‍यक्षांनी आंतरराष्‍ट्रीय न्‍यायालयात दिलेल्‍या अर्जात म्‍हटलं आहे की, युक्रेनमधील नरसंहाला रशियाला जबाबदार धरले पाहिजे. न्‍यायालयाने रशियाला त्‍वरित युक्रेनविरोधातील कारवाई थांबविण्‍याचे आदेश द्‍यावेत. याप्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी सुरु करण्‍यात यावी, अशी अपेक्षाही त्‍यांनी आपल्‍या ट्‍विटमध्‍ये व्‍यक्‍त केलीय.

Russia Ukraine Crisis : युरोपीय संघाकडून रशियाची कोंडी

रशियाच्‍या विमानांना आपल्‍या कार्यक्षेत्रात उड्‍डाण करु देणार नाही.तसेच युक्रेनला शस्‍त्र खरेदीसाठी निधी पुरवला जाणार आहे, अशी घोषणा युरोपीय संघाच्‍या अधिकार्‍यांनी केली आहे. जर्मनीने युक्रेनला पाठिंबा जाहीर करत शस्‍त्रसाठा पुरविण्‍याची घोषणा केली आहे.

बेलारुसचा रशियाला पाठिंबा, युक्रेनला सैनिक पाठवणार

बेलारुसने रशियाला समर्थन दिले आहे. युक्रेनविरोधात लढा देण्‍यासाठी सैनिक पाठवणार असल्‍याचे अमेरिकेच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाच्‍या अधिकार्‍यांनी म्‍हटलं आहे. आजपासून बेलारुस सैनिकाच्‍या तुकड्या युक्रेनकडे रवाना होतील. या घडामोडींची संयुक्‍त राष्‍ट्र महासभेने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात चर्चा करण्‍यासाठी आज बैठक बोलवली असून अध्‍यक्षस्‍थानी संुयक्‍त राष्‍ट्र महासभेचे अध्‍यक्ष अब्‍दुल्‍ला शाहिद असतील. संयुक्‍त राष्‍ट्र महासभेच्‍या इतिहासातील अशा प्रकारची ११ वी आपत्तकालीन बैठक असणार आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडिओ :

 

Back to top button