जागतिक महासत्तांनी चिथावणी देऊन रशियाविरुद्धच्या युद्धात ढकलून दिलेल्या युक्रेनने चार दिवस दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी असली, तरी या युद्धात युक्रेन एकाकी पडत असल्याचे चित्र समोर आले आहे. रशियाची वर्चस्ववादी आणि विस्तारवादी वृत्ती युक्रेनच्या स्वाभिमानाला मान्य होणारी नसली, तरी मुद्दामहोऊन रशियाला खिजवण्याएवढी त्यांची ताकदही नाही. परंतु, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससारख्या तीस राष्ट्रांचा समावेश असलेल्या 'नाटो' संघटनेने भरीस घातल्यामुळे युक्रेन रशियापासून दुरावत आणि पाश्चिमात्य राष्ट्रांच्या जवळ गेला.
बलदंड राष्ट्रांच्या संपर्कात राहून आपणही त्यांचाच भाग असल्याचा भ्रम युक्रेनला होऊ लागला. त्याचीच परिणती रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यात झाली. परंतु, हल्ला करण्याआधी रशियाला इशारे देणार्या आणि युक्रेनच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचा देखावा करणार्या राष्ट्रांनी प्रत्यक्ष हल्ल्यानंतर मात्र सोयीस्कर पलायनाची भूमिका घेतली. युक्रेन हा 'नाटो'चा सदस्य नसल्यामुळे रशियाविरुद्धच्या युद्धात अमेरिका किंवा कुठल्याही 'नाटो' राष्ट्रांचा संबंध नसल्याचे सांगून या बड्या राष्ट्रांनी हात वर केले.
युक्रेनसाठी हा मोठा धक्का असला, तरी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी परिस्थितीपुढे न डगमगता ज्या लढाऊ बाण्याने संघर्ष सुरू ठेवला आहे, तो जगाच्या नजरेत भरणारा आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर दुसर्याच दिवशी रशियन फौजांनी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये घुसखोरी केल्याच्या बातम्या आल्यानंतर युक्रेनचा पाडाव झाल्याचेच चित्र रशियन माध्यमांकडून निर्माण करण्यात येत होते; मात्र झेलेन्स्की यांनी स्वतः कीेव्हच्या रस्त्यावर उतरून रशियाला जशास तसे प्रत्त्युत्तर दिले जात असल्याचे सांगून देशवासीयांचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला.
समोरचा शत्रू आपल्याहून अनेकपट प्रबळ असताना आणि ज्यांच्या भरवशावर युद्धाला सामोरे जायचे होते, त्या पाठिराख्यांनी मागच्या मागे पलायन केले असताना एखाद्या राष्ट्राने गर्भगळीत होऊन शरणागती पत्करली असती. परंतु, झुंजार आणि लढाऊ युक्रेनने जराही न डगमगता संघर्ष सुरू ठेवला. या युद्धाचे आणखी एक वैशिष्ट्य नमूद करावे लागेल, ते म्हणजे जसे ते मैदानावर खेळले जात आहे, तसेच पडद्यामागेही खेळले जात आहे. दोन्ही बाजूंकडून आपापल्या सोयीच्या बातम्या प्रसृत केल्या जात आहेत; परंतु इंटरनेटमुळे सत्य समोर येत आहे.
करायचे काहीच नाही; मात्र खूप काही करीत आहोत, असा देखावा करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न यानिमित्ताने जगासमोर आले. रशियाने हल्ला केल्यानंतर ज्या रितीने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बचावात्मक भूमिका घेतली, ती जगासाठी आश्चर्यकारक तर आहेच; परंतु अमेरिकेच्या महासत्तापदासाठीही धोकादायक आहे. रशियाची युद्धाची खुमखुमी एमरिकेलाच नव्हे, तर सार्या जगाला परवडणारी निश्चितच नाही.
जगाचा फौजदार बनण्याच्या भूमिकेपासून अमेरिका दूर जात असल्याचे यानिमित्ताने दिसत असून यामुळेच रशियावर केवळ निर्बंध लादण्याची भाषा बायडेन करीत आहेत. अमेरिकेचा जगातील दबदबा कमी होण्याची ही सुरुवात म्हणावी लागेल. जॉर्ज बुश, डोनाल्ड ट्रम्प या अध्यक्षांहून जो बायडेन वेगळे असले, तरी बिल क्लिटंन आणि बराक ओबामा यांच्यासारखा कणखरपणाही त्यांच्याकडे नसल्याचा संदेश यानिमित्ताने जगभर गेला आहे. अमेरिकन नागरिकही त्याला प्रतिक्रिया म्हणून भविष्यात पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या वाह्यात आणि वाचाळ अध्यक्षामागे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रशिया थेट युक्रेनवर क्षेपणास्त्रे डागत असताना अमेरिकेच्या अध्यक्षांनी आर्थिक निर्बंधांची भाषा करीत राहणे हास्यास्पद होते. आम्ही तुमच्या बाजूने आहोत; परंतु तुम्हाला थेट मदत करू शकत नाही, हे पलायनवादी राजकारण म्हणता येईल. अशा स्थितीत तटस्थतेची भूमिका घेऊन शांततेचा पुरस्कार करण्याची भारताची भूमिका उठून दिसते. दोन्ही देश आमचे मित्र आहेत आणि युद्ध थांबवून चर्चेतून मार्ग काढावा ही भूमिका समंजस ज्येष्ठासारखीच म्हणावी लागेल. सुमारे सात दशके रशिया आणि युक्रेन हे दोन देश सोव्हिएत संघराज्याचा भाग म्हणून एकत्र राहिले. मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या काळात 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर युक्रेनने आपले स्वातंत्र्य जाहीर केले. ही गोष्ट रशियाला पसंत पडली नव्हती.
युक्रेन स्वतंत्र असले, तरी रशियासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे राष्ट्र होते. त्यामुळेच युक्रेनने सदैव सोबत राहावे, असे रशियाला वाटत होते. अलीकडच्या काही वर्षांत युक्रेनच्या राजधानी कीव्हमध्ये युरोपीय विचारांचा प्रभाव वाढत गेल्यामुळे रशियन आणि युरोप समर्थक असे दोन गट देशात निर्माण झाले, हेही संघर्ष वाढत जाण्याचे एक कारण मानले जाते. दुसरीकडे अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रे युक्रेनला युद्धासाठी घोड्यावर बसवून वरातीतून फरार झाली. युक्रेनचे अध्यक्ष पाश्चिमात्य राष्ट्रांच्या हातातील बाहुले बनले आहेत, हाच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मूळ आक्षेप होता. युक्रेनने पाश्चिमात्य राष्ट्राच्या नादी न लागता तटस्थता बाळगली असती, तरीसुद्धा कदाचित युद्धाचा धोका टळला असता. दुर्दैवाने युद्ध सुरू झाले आहे आणि युक्रेन एकटा पडला आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अमेरिकेसह जर्मनीने युद्धसामग्री देऊ केली असली, तरी रशियासारख्या प्रबळ शत्रूविरुद्ध लढण्यासाठी तेवढी पुरेशी नाही.
आर्थिक निर्बंधांना रशियाने अद्याप भीक घातलेली नाही. त्यामुळे पाश्चिमात्य राष्ट्रांनी उचललेली पावले किती तकलादू आहेत, हेही लक्षात येते. या स्थितीत युक्रेनसमोर शांततेच्या मार्गाने चर्चेतून तोडगा काढण्याचा एकमेव मार्ग उरतो. येत्या काही तासांत रशियासह पाश्चिमात्य राष्ट्रांची भूमिका बदलते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ज्या पाश्चिमात्य राष्ट्रांच्या प्रेमासाठी रशियाशी वैर पत्करले आणि युद्धाला निमंत्रण दिले, ती मंडळी संकटाच्या काळात लांबून गंमत पाहणार असतील, तर अशा प्रेमापासून फारकत घेण्याचा विचार युक्रेनने केला, तरी आश्चर्य वाटायला नको!