

कीव; पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियन सैन्याने युक्रेनमध्ये (russia-ukraine war) भयंकर विध्वंस सुरु केला आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. पण, या युद्धाच्या काळात युक्रेन आपल्या एका सैनिकाचे शौर्याचे कौतुक करत आहे. रशियन रणगाड्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी या युक्रेनच्या सैनिकाने आपल्या जीवाचीही पर्वा न करता स्वत:ला बॉम्बने उडवून घेत रशियन सैन्याचे मनसुबे धुळीस मिळवले. अशाप्रकराने या सैनिकाने देशासाठी स्वत:ला संपवत देशासाठी शहीद झाला. या सैनिकाने युक्रेनचे मनोबल वाढवले असून सध्या त्याचे फक्त कौतुक होत नाहीतर तो सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
त्याचं झाल असं की, रशियन ( russia – ukraine war ) सैन्य हेनिचेस्क पुलाच्या दिशेने जात होते. या पुलावर हा सैनिक तैनात होता. जेव्हा या सैनिकाला रशियन सैन्याला रोखण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता तेव्हा त्याने हा पूल स्वतःच उडवण्याचा निर्णय घेतला. पण वेळ कमी होता. हे पाहून, सैनिक विटाली स्काकुन वोलोडीमायरोव्हिच ( Vitaly Skakun Volodymyrovych) याने स्वत: ला बॉम्बच्या सहाय्यने उडवले आणि पूल नष्ट केला. त्यामुळे हेनिचेस्क ब्रिजवरून जाण्याचे रशियन सैन्याचे मनसुबे उधळले गेले.
रशियन ( russia – ukraine war ) रणगाडे रोखण्यासाठी त्यांने दिलेल्या बलिदानाचे आता युक्रेनियन लष्कराकडून कौतुक होत आहे. या युक्रेनियन सैनिकाला हिरो म्हणून पुढे आणले जात आहे. युक्रेनियन लष्कराने फेसबुकवर लिहिले की, ''जेव्हा रशियन रणगाडे परिसरात घुसले, तेव्हा मरीन बटालियन अभियंता वोलोडीमायरोव्हिच हेनिचेस्क पुलावर तैनात होते. रशियन सैन्य त्याच्या दिशेने सरकले तेव्हाच त्याच्या लक्षात आले की पुरेसा वेळ नाही. त्यामुळे त्याने स्वत:ला उडवून पुलाची नासधूस केली.''
राजधानी कीववर क्षेपणास्त्र हल्ल्यांदरम्यान शुक्रवारी युक्रेनियन नागरिकांनी पोलंड, रोमानिया, हंगेरी आणि स्लोव्हाकियामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली. या भागात मोठ्या संख्येने लोक सीमेवर तासनतास थांबलेले दिसले. गुरुवारी युक्रेनमधून किमान 29,000 लोक पोलंडमध्ये दाखल झाले. मात्र, यापैकी किती युद्ध शरणार्थी आहेत आणि किती मायदेशी परतणार आहेत हे स्पष्ट झालेले नाही.