कीव्ह : वृत्तसंस्था
युक्रेनविरोधात युद्ध पुकारून रशियाने जगाचा नकाशा बदलण्याचे ठरवले आहे. पुतीन यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये सर्व बाजूंनी रशियन फौजा घुसवल्या असून, शहरांवर आणि लष्करी तळांवर एअरस्ट्राईक केला जात आहे. बॉम्बस्फोट, क्षेपणास्त्र हल्ले, मोठमोठ्याने वाजणारे सायरन अशा वातावरणातून रशियन फौजांनी सर्वसामान्य युक्रेनवासीयांवर दहशत बसवली आहे.
युक्रेनची राजधानी कीव्ह येथे अनेक नागरिकांनी रशियाच्या हल्ल्यांपासून जीव वाचविण्यासाठी बंकर, मेट्रो रेल्वेस्थानके आणि सब-वेमध्ये आश्रय घेतला आहे. गुरूवारची रात्री कीव्हवासीयांनी अशीच दहशतीखाली अक्षरशः जागून काढली आहे. कीव्हमध्ये हजारो नागरिकांनी मेट्रो रेल्वेस्थानकांवर गर्दी केली आहे आणि सब-वेंचा वापर बॉम्बहल्ला, क्षेपणास्त्र हल्ल्यांतून जीव वाचविण्यासाठी शेल्टर म्हणून केला जात आहे.
अनेकांनी राहत्या घराच्या खाल्याही बॉम्बहल्ल्यापासून संरक्षणार्थ शेल्टर रूम बनवून घेतल्या आहेत. सब-वे आणि बंकरमध्ये राहणार्या नागरिकांचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. एकावर एक झोपता यावे अशा पद्धतीने या ठिकाणी नागरिकांची सोयही केली आहे. तथापि, बाहेरील जीवनाशी या लोकांचा संपर्क अजिबात नाही. ठरावीक लोकांनी सोबत अन्नाची पाकिटेही ठेवलेली आहेत. हे सर्व या व्हिडीओंमधून समोर येत आहे. दरम्यान, रशियाची दोन विमाने युक्रेनने पाडली. एक विमान घरावर कोसळले, तर दुसरे विमान नऊमजली इमारतीवर कोसळले. दर 20 मिनिटाला येथे एक बॉम्बस्फोट होत आहे. जेव्हा जेव्हा अलार्म वाजतो किंवा ऑनलाईन एखादी माहिती कळते तेव्हा आम्ही बंकरमध्ये जाऊन लपतो, असे एक युवती सांगताना दिसते.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम जगावर दिसू लागले आहेत. कोरोनाच्या परिणामांतून विविध देश आणि बँकांची स्थिती सावरत असताना भूराजकीय स्थितीमुळे निर्माण होत असलेल्या तणावांमुळे पुन्हा एकदा चिंतेत भर पडलेली आहे. नोमुरा या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारत, फिलिपाईन्स आणि थायलंड या तीन देशांना या तणावाचा मोठा फटका बसणार आहे. भारताला याचा मोठा फटाका बसण्याचे कारण खनिज तेल आहे. भारताचा खनिज तेलासाठीचा दर्जा नेट इम्पोर्टर असा आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 10 टक्के जरी वाढ झाली तरी भारताचा जीडीपी 0.20 टक्क्यांनी घसरू शकतो, असे मत या संस्थेचे आहे. अरूप नंदी आणि सोनल वर्मा या तज्ज्ञांनी हा अहवाल बनवला आहे. ग्राहक आणि व्यवसाय अशा दोन्ही कारणांसाठी लागणार्या तेलाला दरवाढीचा फटका बसणार आहे, असे ते म्हणतात.