

Thailand Cambodia Border Clash
थायलंड आणि कंबोडिया यांच्यात पुन्हा एकदा सीमेवरून तणाव वाढला आहे. गुरुवारी दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सहापेक्षा अधिक सीमा भागात भागात चकमकी उडाल्या. यात थायलंडचे १२ जणांचा मृत्यू झाला. यात बहुतांश नागरिकांचा समावेश आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. थायलंडने हवाई हल्लेही केल्यानंतर कंबोडियानेदेखील प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. भूसुरुंग स्फोट, गोळीबार आणि हवाई हल्ल्यांसह हा संघर्ष तीव्र झाला आहे.
भूसुरुंग स्फोटात थायलंडचे पाच सैनिक जखमी झाल्यानंतर तणाव आणखी वाढला. दरम्यान, थायलंडने कंबोडियन राजदूताची हकालपट्टी करत ईशान्येकडील सर्व सीमा बंद केल्या आहेत. कंबोडियाने त्याला प्रत्युत्तर म्हणून बँकॉकमधील त्यांचे दूतावास रिकामे केले. त्यानंतर सुरीन आणि ओद्दार मीन्चे या सीमा भागातील प्रांतांजवळील अनेक ठिकाणी दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये चकमकी उडाल्याचे वृत्त आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, थायलंडच्या एका F-16 लढाऊ विमानाने कंबोडियातील ठिकाणांवर हवाई हल्ले केले.
गुरुवारी सकाळी ता मुएन आणि ता मोन थोम मंदिराजवळ संघर्ष सुरु झाला. या दोन्ही देशांचा अनेक वर्षांपासून या ठिकाणावर दावा राहिला आहे. थायलंड सैन्याच्या म्हणण्यानुसार, कंबोडियन सैन्याने प्रथम गोळीबार सुरु केला. यानंतर थायलंड सैन्याने त्याला प्रत्युत्तर दिले. तथापि, कंबोडियाने असाही दावा केला आहे की त्यांचे सैन्य थायलंडच्या सशस्त्र हल्ल्यापासून त्यांच्या राष्ट्रीय भूभागाचे संरक्षण करत आहेत.
कंबोडियाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात थायलंडचे काही नागरिक ठार झाले आहेत. तसेच पाच वर्षांच्या मुलासह तिघे जखमी झाले, असे थाई अधिकाऱ्यांनी सांगितले. थायलंडने असेही म्हटले आहे की त्यांचे ७ सैनिक जखमी झाले आहेत. एका फेसबुक पोस्टमध्ये, थाई सैन्याने कंबोडियावर सुरीनच्या काप चोएंग जिल्ह्यात बीएम-२१ रॉकेट डागल्याचा आरोप केला आहे. हे रॉकेट नागरी वस्तीत कोसळले.
दोन्ही देशांदरम्यान सुरु असलेला विशेषतः १ हजार वर्षे जुन्या प्रेह विहेयर मंदिरासाठी (Preah Vihear temple) हा वाद काही नवीन नाही. हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १९६२ मध्ये हे मंदिर कंबोडियामध्ये असल्याचा निकाल दिला. परंतु थायलंडचा या निर्णयाला विरोध राहिला. हे ९ व्या शतकातील एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर खमेर सम्राट सूर्यवर्मन यांनी उभारले होते. हे एक शिव मंदिर आहे. हे मंदिर कंबोडियाच्या सीमा भागातील प्रांतात आहे. पण थायलंडचा दावा आहे की या मंदिराचा काही भाग त्यांच्या देशाच्या हद्दीत येतो.
७ जुलै २००८ मध्ये या ऐतिहासिक मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशांमधील वाद आणखी वाढला. २००८ ते २०११ दरम्यानच्या काळात यासाठी अनेक वेळा संघर्ष झाल्याचे दिसून आले. २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करत कंबोडियाच्या दाव्याची पुष्टी केली. २०११ मध्ये झालेल्या गोळीबारात सैनिक आणि नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे हजारो लोकांना आपली घरे सोडून जावे लागले.