Shoaib Akhtar : जनावरे खाऊन आम्हीपण जनावरांसारखेच बनलो | पुढारी

Shoaib Akhtar : जनावरे खाऊन आम्हीपण जनावरांसारखेच बनलो

नवी दिल्‍ली : आमच्या देशात अनेक जनावरे खाल्ली जातात आणि त्यामुळे आमचे गोलंदाजही जनावरांसारखेच बनले आहेत, असे वक्‍तव्य पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने केले आहे. 46 वर्षीय अख्तर मागील काही वर्षे भारतीय जलदगती गोलंदाजांचे कौतुक करतोय. पण जेव्हा पाकिस्तानी गोलंदाजांशी तुलनेचा प्रश्‍न आला तेव्हा त्याने त्याच्या देशातील गोलंदाजांमध्ये अधिक ऊर्जा असल्याचे म्हटले.

ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली याच्यासोबत बोलताना अख्तरने (Shoaib Akhtar) पाकिस्तानचा पेस अटॅक कसा सर्वोत्तम आहे, यासाठी काही उदाहरण दिले. तो म्हणाला, भारत आणि पाकिस्तान यांच्या जलदगती गोलंदाजांमध्ये बराच फरक आहे. भारतातून चांगले जलदगती गोलंदाज येत आहेत, परंतु त्यांच्याकडे ती खास प्रकारची ऊर्जा नाही. ते चेहर्‍यावर राग दाखवत नाहीत.

तो अ‍ॅटिट्यूड आमच्या गोलंदाजांमध्ये दिसतो. त्यांच्या चेहर्‍यावरच तो राग असतो जो फलंदाजांना सांगतो की, आता मी तुझा जीव घेईन. या गोष्टीला त्याने पाकिस्तानातील वातावरण आणि खाण्या-पिण्याच्या सवयी कारणीभूत असल्याचे सांगितले. तो म्हणाला, आमच्याकडील वातावरण, अन्न आणि अ‍ॅटिट्यूड आम्हाला असे बनवते. त्यामुळे आमच्या गोलंदाजांमध्ये सतत एनर्जी दिसेल.

त्यामुळे जलदगती गोलंदाजांनाही वेगळा आनंद मिळतो. पाकिस्तानचे खेळाडू स्ट्रीक्ट नॉन-व्हेज डाएट फॉलो करतात. जे तुम्ही खाता, तसेच तुम्ही बनता. आमच्या देशात अनेक जनावरे खाल्ली जातात आणि आम्हीपण जनावरासारखेच बनलो आहोत. त्यामुळेच जेव्हा जलदगती गोलंदाजी करण्याची वेळ येते, तेव्हा आम्ही सिंहासारखे पळतो.

Back to top button