गौतम अदानी देशात सर्वांत श्रीमंत, मुकेश अंबानी यांना मागे टाकले | पुढारी

गौतम अदानी देशात सर्वांत श्रीमंत, मुकेश अंबानी यांना मागे टाकले

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मंदीचे सावट आहे. त्यामुळे रिलायन्स कंपनीचे शेअर्स धडाधड कोसळत आहेत. त्याचा फटका मुकेेश अंबानी यांच्या कमाईला बसला आहे. त्यामुळे मंगळवारी गौतम अदानी यांनी कमाईच्या बाबतीत मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे.

‘फोर्ब्स’च्या अहवालानुसार, मुकेश अंबानी यांना पीछाडीवर टाकत गौतम अदानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती ठरले आहेत, तर जागतिक श्रीमंतांच्या यादीत अदानी 11 व्या स्थानी पोहोचले आहेत.

अहवालानुसार, अदानी यांची एकूण संपत्ती 90 अब्ज डॉलर्स (सुमारे 6.72 लाख कोटी) आणि मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 89.8 अब्ज डॉलर्स (6.71 लाख कोटी) आहे.

दोन दिवसांत रिलायन्सचे शेअर्स 155 रुपयांनी घसरले मुंबई स्टॉक एक्स्चेंजच्या (बीएसई) आकडेवारीनुसार, दोन दिवसांत रिलायन्सची शेअर्स किंमत 155 रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत मुकेश अंबानी यांची संपत्ती 7 अब्ज डॉलर्सनी (52 हजार कोटी रुपये) कमी झाली आहे.

‘फोर्ब्स’च्या आकडेवारीनुसार, 31 डिसेंबर 2021 मध्ये गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 78 अब्ज डॉलर्स (5.82 लाख कोटी) होती. 18 जानेवारी 2022 मध्ये 93 अब्ज डॉलर्स (6.15 लाख कोटी) झाली आहे. सध्या अदानी यांची एकूण संपती 90 अब्ज डॉलर्स (6.72 लाख कोटी) झाली आहे. याचा हिशेब केल्यास अदानी यांची रोजची कमाई 6 हजार कोटी रुपये झाली आहे.

Back to top button