प्रजासत्ताक दिन : अखंड तेवणारा नंदादीप | पुढारी

प्रजासत्ताक दिन : अखंड तेवणारा नंदादीप

प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण. राष्ट्रप्रेम ही काही दिवाळीच्या चार दिवसांत दारात पेटविली जाणारी पणती नाही की, जी फक्त रोषणाईसाठी वापरली जाते. राष्ट्रप्रेम हा एक अखंड तेवणारा नंदादीप आहे, जो मनामध्ये आयुष्यभर प्रज्वलित ठेवणे हे प्रत्येकाचे परमकर्तव्य आहे.

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन्हीही खरे तर आपले राष्ट्रीय सण, जे अपूर्व उत्साहात साजरे करणे अपेक्षित आहे. 15 ऑगस्टने आपल्याला स्वतंत्र चेहरा दिला आणि 26 जानेवारी 1950 रोजी त्या चेहर्‍याला स्वत:ची ओळख दिली. ओळख स्वतंत्र नीतीनियमांची, ओळख स्वतंत्र आणि आदर्श नागरिक म्हणून जगताना पाळाव्या लागणार्‍या जाबाबदार्‍यांची, ओळख संपूर्ण राष्ट्राच्या विचारसरणीची. घटनेच्या या भक्कम पायावरच कधीकाळी साप-गारुड्यांच्या आपल्या देशाने समाज सुधाराची आणि विकसनशीलतेची नवी शिखरे गाठली आहेत. बुद्धिमान, प्रामाणिक, कष्टाळू अशी भूषणावह ओळख आज नव्याने जगाला होऊ लागली आहे. कधी काळी सोन्याचा धूर निघत असलेल्या भूमीवरील विझलेल्या ढिगार्‍यातही भारतीयांच्या प्रतिमेचे आणि सर्जनशीलतेचे निखारे अजूनही फुलत आहेत, याची जाण जगाला नक्कीच आहे. म्हणूनच आपल्या प्रगतीसाठी ‘आरंभ’ असलेल्या या दोन सणांप्रती असलेली उदासिनता कुठेतरी नाराज करते. वैयक्तिक आयुष्यातील कुठलीही आनंददायी घटना आपण दरवर्षी साजरी करून नव्याने जगतो. मग, या सार्वत्रिक उत्सवांचे असे का? काय आहे या औदासिन्याचे कारण? पावसाळ्यात उगविणार्‍या छत्र्यांप्रमाणे केवळ या दोनच दिवशी समाजामध्ये उगविणारा राष्ट्रप्रेमाचा अतिरेक? की वर्षभर केवळ टीआरपी वाढविण्यासाठी दूरचित्रवाहिन्यांनाच दिवसात येणारे राष्ट्रप्रेमाचे भरते? की एकूणच सर्वच माध्यमांतून पाजला जाणारा राष्ट्रभक्तीचा ओव्हरडोस? एक कारण शोधायला जावे, तर 100 कारणे सापडतील.

खरे तर, राष्ट्रप्रेम ही काही दिवाळीच्या चार दिवसांत दारात पेटविली जाणारी पणती नाही की, जी फक्त रोषणाईसाठी वापरली जाते आणि काम झाले की, पुढच्या वर्षासाठी गुंडाळून ठेवली जाते. राष्ट्रप्रेम हा तर एक अखंड तेवणारा नंदादीप आहे, जो मनामध्ये आयुष्यभर प्रज्वलित ठेवणे हे प्रत्येकाचे परमकर्तव्य आहे. राष्ट्रप्रेम म्हणजे असते काय? तर राष्ट्राची अस्मिता जपणे आणि तिचा आब राखणे. राष्ट्राची शान वाढविणे यामध्येच दडलेले असते राष्ट्रप्रेम. राष्ट्राची अस्मिता असते गड-किल्ल्यांमध्ये, पुरातन, प्राचीन मंदिरांमध्ये, धर्मग्रंथांमध्ये, नैतिक मूल्यांंमध्ये, राष्ट्रपुरुषांची कर्मभूमी, जन्मभूमी आणि विचारधारा जपण्यामध्ये, राष्ट्राच्या वन्यजीव आणि सांस्कृतिक विविधतेमध्ये, राष्ट्रभाषेमध्ये आणि विचारवंतांनी लिहिलेल्या आणि जपलेल्या ग्रंथसंपदेमध्ये. राष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू आपल्या अगदी जवळ असतात; पण आपण ते किती जपतो?

घटनेने बहाल केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्य या एकाच अधिकाराचा उपभोग घेण्यात आपण सर्वजण मश्गुल आहोत. जी जात-पात नष्ट करण्यासाठी, समाजातील उच्च-नीच स्तर समतोल राखण्यासाठी कित्येक समाजसुधारकांनी आयुष्य वेचले, त्याच जातीपातीच्या राजकारणावर आज अनेक पक्ष उभे आहेत. परमोच्च राष्ट्रप्रेमाचा विचार मनात ठेवून जे शहीद होतात, त्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या विरत्वाची चिरफाड होत आहे. स्वार्थासाठी डोंगरांच्या टेकड्या आणि नद्यांची गटारे करतानाही त्यांच्यामध्ये कुठेही अपराधीपणाचा लवलेशही नाही.
विरश्री जागृत होते जवानांची लयबद्ध संचलने, त्यांनी राष्ट्रध्वजाला दिलेली दमदार सलामी बघताना! मन कौतुकाने भरून येते ते संस्कृतीच्या चित्ररथांवरील सादरीकरणातून. अक्कडबाज मिशांच्या आणि भरदार शरीरयष्टीच्या शूर जवानांचे फोटो छातीशी कवटाळून त्यांच्या तरुण विधवा जेव्हा उदास चेहर्‍याने त्यांना मिळालेले मरणोत्तर पुरस्कार स्वीकारतात तेव्हा दाटतो हुंदका आपल्याही घशात. म्हणूनच या सर्वांची आठवण वर्षभर मनात जागृत ठेवून विधायक आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी पूरक आचरण करणे हीच खरी सलामी आहे. शक्य असेल, तर लष्करातील विविध पदांवर काम करून राष्ट्रसेवा करता आली, तर ती होईल खरी श्रद्धांजली त्या अनाम वीरांना. हे प्रत्येकाला साध्य होईल, असे नाही; पण म्हणून त्या शक्यतेचा, त्या संधीचा विचारही करू नये, असेही नाही. शेवटी कोणीतरी लष्करात भाकर्‍या भाजत आहेत म्हणून आपण दोनवेळ जेवत आहोत, हे कधीही विसरता कामा नये. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वांनाच सदिच्छा!

– स्वाती देसाई

Back to top button