

पुणे : गेल्या तीन महिन्यांमध्ये देशभरातील प्रमुख सात शहरांत 1.58 कोटी चौरस फूट जागा विविध कार्यालयांनी लीजवर घेतली असून, त्यात मुंबई आणि पुण्याचा वाटा तब्बल 50 लाख चौरस फूट (32 टक्के) आहे. पुणे शहरातील 17 लाख चौरस फूट कार्यालयीन जागांचा समावेश आहे. मास्टर कार्ड, बजाज फायनान्स, सुमा सॉफ्ट कंपनीने पुण्याला पसंती दिली. जगप्रसिद्ध वाहननिर्मिती कंपनी टेस्लाने देशातील पहिले कार्यालय उभारण्यासाठी नुकतीच पुणे शहराची निवड केली आहे. पाठोपाठ मास्टर कार्डसह देश आणि विदेशातील विविध कंपन्यांनी पुणे शहरातील 17 लाख चौरस फूट जागा लीजवर घेतली आहे.
त्यात बँकिंग फायनान्शिअल सर्व्हिसेस (बीएफएसआय) क्षेत्राचा सर्वाधिक 41 टक्के वाटा आहे. खालोखाल 17 टक्के वाटा तंत्रज्ञान क्षेत्राचा आहे. पुण्याचा विचार केल्यास 50 हजार चौरस फुटांखालील जागांसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडून अधिक मागणी आहे. कार्यालय लीजवर घेण्याच्या प्रमाणात पुण्यात वार्षिक 59 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. देशातील एकूण मागणीच्या दहा टक्के वाटा पुण्यातील कार्यालयांचा आहे.
देशातील नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, कोची, अहमदाबाद आणि पुणे या नऊ प्रमुख शहरांमधील 1.58 कोटी चौरस फूट जागा गेल्या तिमाहीत लीजवर घेतल्या गेल्या आहेत. त्यात बीएफएसआय क्षेत्राचा 29 टक्के वाटा आहे. त्यातही मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबादला त्यासाठी सर्वाधिक पसंती राहिली आहे. सीबीआरई साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेडने देशातील लीजवर गेलेल्या कार्यालयीन जागांचा अहवाल मंगळवारी सादर केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. खालोखाल अभियांत्रिकी आणि उत्पादन कंपनी, लाइफ सायन्स फर्मचा वाटा प्रत्येकी दहा टक्के आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवा देणार्या कंपन्यांचा वाटा 23 टक्के आहे.
आर्थिक राजधानी मुंबईत 33 लाख चौरस फूट जागा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत लीजवर गेली आहे. त्यात बँकिंग फायनान्शिअल सर्व्हिसेस (बीएफएसआय) क्षेत्राशी निगडित कंपन्यांचा वाटा तब्बल 63 टक्के आहे. तंत्रज्ञान 10, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्राचा 8 टक्के वाटा आहे.
हेही वाचा