चक्क 5 फूट 3 इंचांची चप्पल

चक्क 5 फूट 3 इंचांची चप्पल

बुरहानपूर : परिस्थिती कशीही असो, स्वप्ने मोठी असली पाहिजेत आणि हेच ब्रीद उराशी बाळगत नयामतपुरा येथील एका तिसरी पास कलाकाराने चक्क 5 फूट 3 इंचांची अनोखी चप्पल प्रत्यक्षात साकारली आहे. रमेश चित्रे असे या कलाकाराचे नाव असून गिनिज बुकात नाव नोंदवले जावे, असे त्याचे प्रयत्न आहेत. यातूनच त्याने हा उपक्रम राबवला.

या चपलेची उंची एखाद्या व्यक्तीइतकी उंच आहे. शिवाय, 15 चपला तयार करण्यासाठी लागेल, इतकी साधनसामग्री यासाठी लागली आहे. आजवर जिल्ह्यात अन्य कोणतीही इतकी मोठी चप्पल तयार केली गेलेली नाही.

सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीची उंची साडेपाच फुटांच्या आसपास असते. या चपलेची उंची देखील जवळपास तितकीच आहे. मध्य प्रदेशमधील ही सर्वात मोठी चप्पल पाहण्यासाठी बरीच गर्दी होते आहे. रमेश चित्रे या कलाकाराने गिनिज बुककडे आपण संपर्क साधला असून या चपलेची नोंद घेतली गेली नाही तर यापुढे दहा फुटी चप्पल प्रत्यक्षात साकारण्याचा मानस यावेळी व्यक्त केला आहे.

रमेश चित्रे मागील 25 वर्षांपासून चपला तयार करत आहेत. शिवाय, त्यांचा वंशपरंपरागत व्यवसायही आहे. आताही आपल्या दुकानात ते अर्ध्या डझनपेक्षा अधिक विविधतेच्या चपला तयार करतात. पूर्णपणे चामडापासून ते चपला तयार करतात. लोकांची आवड-निवड व त्यांची ऑर्डर पाहून त्याप्रमाणे चप्पल तयार करण्यावर आपला भर असतो, असे ते याप्रसंगी सांगतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news