भारतात खाद्यतेल आणखी महागणार; इंडोनेशियाचा तेल निर्यात बंदीचा निर्णय

भारतात खाद्यतेल आणखी महागणार; इंडोनेशियाचा तेल निर्यात बंदीचा निर्णय
Published on
Updated on

जकार्ता; पुढारी ऑनलाईन

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात खाद्यतेलाचे दर भडकले. यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडले. आता खाद्यतेलाचे दर आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. पाम तेलाचा मोठा निर्यातदार देश असलेल्या इंडोनेशियाने (Indonesia) पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे भारतावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

इंडोनेशिया पुढील आठवड्यापासून पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालणार असल्याचे इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी स्पष्ट केले आहे. इंडोनेशियाने देशांतर्गत मागणीच्या पुर्ततेसाठी हा निर्णय घेतला आहे. इंडोनेशियात पाम तेलाची टंचाई जाणवत आहे. त्यासाठी देशांतर्गत मागणीची पुर्तता करण्यासाठी पाम तेल निर्यातीवर बंदी लागू केली आहे.

भारत इंडोनेशिया आणि मलेशियातून आयात होणाऱ्या पाम तेलावर अवलंबून आहे. एकट्या इंडोनेशियातून ६५ टक्के पाम तेल भारतात आयात केले जाते. भारतात दरवर्षी १५० लाख टन खाद्यतेल आयात केले जाते. मुख्यतः इंडोनेशिया आणि मलेशियातून ९० लाख टन पाम तेल आयात केले जाते. तर रशिया आणि युक्रेनमधून सूर्यफूल तेल आयात केले जाते. या दोन देशांतून सुमारे ६० लाख टन सूर्यफूल तेलाची आयात केली जाते.

पण इंडोनेशियातील अधिकाऱ्यांना आता टंचाई आणि वाढत्या किंमतीची चिंता लागली आहे. यामुळे सुरक्षित पुरवठा ठेवण्याकडे त्यांचा कल दिसत आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "सरकार खाद्यतेलाच्या कच्च्या मालाची निर्यात प्रतिबंधित करत आहे. मी या धोरणाच्या अंमलबजावणीचे निरीक्षण आणि मूल्यमापन करत राहीन. जेणेकरून देशात खाद्यतेल परवडणाऱ्या किमतीत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल."

इथल्या अधिकार्‍यांनी जानेवारीमध्ये पाम तेलाची निर्यात मर्यादित ठेवली होती. तेलाच्या वाढत्या किंमती मर्यादित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. अन्नधान्याच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर इंडोनेशियन सरकारने काही घटकांसाठी रोख सबसिडी जाहीर केली होती. तरीही अनेक ठिकाणी अन्नधान्यांसाठी लोकांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. बाजार आणि किराणा दुकानात जीवनाश्यक वस्तू मिळणे कठीण झाले आहे.

देशांतर्गत गरजांकडे लक्ष न देता पाम तेल निर्यातीसाठी परवाने जारी केल्या प्रकरणी ॲटर्नी जनरल कार्यालयाने काही पाम तेल कंपन्यांतील अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. या कार्यालयाने इंडोनेशियातील तीन मोठ्या पाम तेल कंपन्यांमधील अनेक उच्चपदस्थ अधिकार्‍यांना अटक केली होती. ज्यात सिंगापूरस्थित विशाल विल्मर इंटरनॅशनलची उपकंपनी विल्मर नाबती इंडोनेशिया यांचा समावेश आहे.

पाम तेल हे इंडोनेशियामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे वनस्पती तेल आहे. तर क्रूड पाम तेल सौंदर्यप्रसाधनांपासून चॉकलेट स्प्रेडपर्यंतच्या विविध वापरासाठी जगभरात निर्यात केले जाते.

पहा व्हिडिओ : युद्ध युक्रेनमध्ये पण फोडणी महागली भारतात | Russia- Ukraine War

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news