

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील मार्केट यार्ड मध्ये आणि शहराच्या मध्यवर्ती भागात अलेल्या गव्याला पकडण्यात अखेर यश आले आहे. रात्री दीडच्या सुमारास या गव्याला सुस्थितीत पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात हलवण्यात आले. वनविभाग, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, डॉक्टर, प्राणिमित्र संघटना आदींच्या माध्यमातून सलग अठरा तास ही मोहीम सुरू होती. दरम्यान, गव्याला व्यवस्थितरित्या पकडून बाहेर सोडण्यात आल्याने नागरिकांनी आता निश्वास टाकलेला आहे.
कृष्णा नदीच्या पलीकडे सांगलीवाडीच्या शिवारात गेल्या तीन दिवसांपूर्वी दिसलेला गवा सोमवारी मध्यरात्री आयर्विन पूल ओलांडून सांगली शहरात आला आणि त्याने यंत्रणेची झोप उडवली. वन विभाग, पोलिस, प्राणीमित्र आणि माध्यम प्रतिनिधींनी गणपती मंदिर ते वसंतदादा मार्केड यार्ड या गव्याच्या प्रवासाचा पाठलाग केला. गवा अचानक समोर आल्यानंतर अनेकांची भंबेरी उडाली. मार्केट यार्डमधील वेअर हाऊसमधील दोन मोठ्या इमारतींमध्ये तो अडकून पडला. त्यानंतर त्याला एकच खळबळ शहरात उडाली. त्या गव्याला रेस्क्यू करण्यासाठी मंगळवारी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत ऑपरेशन सुरू होते.
वनविभागाचे उपवनसंरक्षक विजय माने, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित सासणे, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, अजित उर्फ पापा पाटील यांच्यासह स्थानिक प्राणीमित्र मुस्तफा मुजावर, सचिन साळुंखे, कौस्तुभ पोळ, अमोल पाटील यांच्यासह कोल्हापूर आणि पुण्यातील टीम ऑपरेशनमध्ये सहभाग होता.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी राज्य शासनाने दिलेले वन्यजीव सुरक्षित वाहतूक वाहन येथे पाचारण करण्यात आले. या वाहनात खास जंगली जनावरांना सुरक्षितपणे नेण्यासाठी आवश्यक सुविधा आहेत. जनावरांनी वाहनात धडका मारल्या तरी त्याच्या शरिराचे तापमान वाढू नये, यासाठी पाणी फरावण्याची अंतर्गत सोय आहे. त्याला फिरायला फार जागा राहू नये, यासाठी छोटे दोन कप्पे केले आहेत. येथे वाहनातून प्रवासात गवा खाली बसला तरी त्याला जखम होऊ नये, यासाठी त्यात भुस्सा भरण्यात आला. निसर्गाचा फिल देण्यासाठी गाडीत कडबा आणि गवतही टाकण्यात आले होते.
गव्याच्या डोळ्याला जखम झाली असून त्या डोळ्याने तो पाहू शकतोय किंवा नाही, याबाबत यंत्रणा थोडी संभ्रमात होती. त्या डोळ्याजवळ माशा दिसत होत्या. रात्रीत प्रवास करताना अनेकदा झुडपातून तो गेला होता. शिवाय, एका वाहनाला त्याने धडक दिली होती. भिंत ओलांडण्याचाही प्रयत्न करत होता. त्यावेळी ही जखम झाली असावी, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.
या गव्याचे वय अंदाजे बारा वर्षे असावे असे तेथील जाणकारांनी सांगितले. पूर्ण वाढ झालेला हा नर गवा असून तो प्रचंड ताकदीचा आहे. गेल्या चार दिवसांत त्याने कुठेही माणसांना जखमी केलेले नाही किंवा अन्य गोंधळ घातलेला नाही. त्यामुळे तो शांत असल्याचे स्पष्ट होते.
हेही वाचलत का?